पिंपरी : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या भामा आसखेड जलवाहिनीचे काम संथगतीने सुरू असताना कामाच्या खर्चातही विविध कारणांमुळे वाढ होत आहे. जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अडथळा ठरणारे उच्चदाब वीज खांब हलविण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने तीन कोटी चार लाख ६३ हजार ४४८ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे खर्चात तीन कोटींनी वाढ होणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता महापालिकेने आंद्रातून १०० आणि भामा आसखेड धरणातून १६७ असे २६७ एमएलडी पाणी आणण्याचे नियोजन केले. धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी महापालिकेने २०२० मध्ये निविदा प्रक्रिया राबवून जलवाहिनी टाकण्याचे काम ऑफशोअर इंडिया लि. या ठेकेदाराला दिले. या कामाची चार वर्षांची मुदत संपली, तरी हे काम अपूर्णच आहे. या जलवाहिनीचे काम ५० टक्केच पूर्ण झाले आहे. नवलाख उंब्रेपासून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. जलवाहिनीचे संपूर्ण काम १६२ काेटी रुपयांचे आहे. याचा कार्यारंभ आदेश १५ डिसेंबर २०२० राेजी दिला हाेता. कामाची मुदत १५ डिसेंबर २०२४ अशी चार वर्षांची हाेती. मात्र, या मुदतीत १९ किलाेमीटरपैकी केवळ नऊ किलाेमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.

३०० उच्चदाब खांब हलविणार

खेड येथील वाकीतर्फे वाडा येथील अशुद्ध जलउपसा केंद्रापासून इंदोरीपर्यंत जलवाहिनीच्या कामाला ३०० उच्चदाब खांब अडथळा ठरत आहेत. हे खांब हलविण्यासाठी महापालिकेने सात दिवसांच्या अल्पमुदतीची तीन कोटी चार लाख ६३ हजार ४४८ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. महावितरणच्या परवानगीनंतर शुल्क भरून हे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.

आंद्रा धरणाच्या जलवाहिनीच्या कामाला सुरुवात नाही

आंद्रा धरणातील पाणी नवलाख उंब्रे येथून एकाच जलवाहिनीतून चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात येणार आहे. त्यासाठी साडेसात किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. परंतु, या कामाला अद्याप सुरुवात झाली नाही. सध्या इंद्रायणी नदीतून निघोजे बंधाऱ्यातून पाणी उचलले जाते.

भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिनीला अडथळा ठरणारे उच्चदाब खांब हलविण्यात येणार आहेत. त्यासाठी सात दिवसांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी सांगितले.

Story img Loader