पिंपरी : गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाळ्यात अपुरा, अनियमित, कमी दाबाने आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाणी पुरत नसल्याने शहरातील सर्वच भागांतील बहुतांश गृहनिर्माण संस्था टँकरवर अवलंबून आहेत. त्यासाठीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असला, तरी खासगी व्यावसायिकांवर नियंत्रण नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकर कात्रीत सापडले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २७ लाखांवर गेली आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिका पवना धरणातून प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर (एमएलडी), आंद्रातून ८० आणि औद्योगिक विकास महामंडळाकडून २०, असे ६२० दशलक्ष लिटर पाणी उचलते. यापैकी ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याचे प्रशासन काही वर्षांपासून सांगत आहे. मात्र, त्यावर ठोस उपाय अद्याप सापडत नाही, अशी स्थिती आहे.
लहान गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना १३५ लिटर प्रतिदिन प्रतिमाणशी, तर मोठ्या संस्थांमधील रहिवाशांना ९० लिटर पाणी दिले जाते. जास्त पाणी लागणाऱ्या संस्थांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, मुळात मानकाप्रमाणे प्रतिदिन प्रतिमाणशी १३५ लिटर पाणी मिळत नसल्यानेच टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते, असा रहिवाशांचा आरोप आहे.
पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रावेत, पुनावळे, वाकड, ताथवडे, चिखली, मोशी भागातील गृहनिर्माण संस्थांना उन्हाळ्यात टँकरवर अवंलबून राहावे लागते. फेब्रुवारी महिना सुरू होताच विंधन विहिरी (बोअरवेल) कोरड्या पडतात. परिणामी, टँकरच्या पाण्याशिवाय पर्याय राहत नाही.
गृहनिर्माण संस्थांच्या खर्चात वाढ
पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांकडून मागविण्यात येणाऱ्या टँकरच्या संख्येत वाढ झाल्याने देखभाल खर्चाच्या रकमेतही वाढ झाली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना अधिकच्या रकमेची तरतूद करावी लागते. वापरण्याच्या पाण्याचा १० हजार लिटरचा एक टँकर १२०० ते १५०० रुपयांना, तर पिण्याच्या पाण्याचा टँकर तीन हजार रुपयांना मिळतो. याचा आर्थिक भुर्दंड रहिवाशांना सहन करावा लागतो.
धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा
पवना धरणात आजमितीला ४०.४४ टक्के, तर आंद्रा धरणात ४३.७२ टक्के पाणीसाठा आहे. १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. ऊन वाढल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
महापालिका गरजेपेक्षा जास्त पाणी उचलते. पाणी वितरणाचे नियोजन नाही. कृत्रिम पाणीटंचाई आहे. पाण्याची समस्या असती, तर शासनाने नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी परवानगी दिली नसती. एका दिवसाला पाच टँकर मागवावे लागतात. महिन्याला टँकरवर एक ते दीड लाख रुपये खर्च होतो.- दत्तात्रय देशमुख,अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड को-ऑप. हौसिंग सोसायटी फेडरेशन
पाणीपुरवठा विस्कळीत झाला तरच टँकरद्वारे पाणी दिले जाते. महापालिकेचे आठ टँकर आहेत. खासगी टँकरवर महापालिकेचे नियंत्रण नाही. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे.-अजय सूर्यवंशी,सह शहर अभियंता,पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका