पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने लिंबांच्या मागणीत माेठी वाढ झाली आहे. उन्हाळ्यात रसवंतीगृह चालक, सरबत विक्रेते, तसेच घरगुती ग्राहकांकडून लिंबांच्या मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री आठ ते दहा रुपये दराने केली जात आहे.

लिंबांची लागवड सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन भागात मोठ्या प्रमाणावर केली जाते. उन्हाचा चटका वाढल्यानंतर लिंबांना मागणी वाढली असून, सध्या बाजारात लिंबांची आवक कमी प्रमाणावर होत आहे. घाऊक बाजारात महिनाभरापूर्वी बाजारात सोलापूर, अहिल्यानगर भागातून लिंबांच्या अडीच हजार गोण्यांची आवक होत होती. सध्या बाजारात दररोज साधारणपणे १५०० ते १६०० गोणी लिंबांची आवक होत आहे. एका गोणीत आकारमानानुसार ३०० ते ४०० लिंबे असतात. मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात एका लिंबाची विक्री प्रतवारीनुसार आठ ते दहा रुपयांनी केली जात असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील लिंबू व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.

लिंबांच्या लागवडीसाठी पाणी मोठ्या प्रमाणावर लागते. उन्हाळ्यामुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने लागवडीवर परिणाम झाला आहे. उन्हाळ्यात सरबत विक्रेते, रसवंती गृहचालकांकडून लिंबांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने यापुढील काळात लिंबांच्या मागणीत आणखी वाढ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हैदराबाद, चेन्नईतील लिंबांची आवक

मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व बाजारपेठेत सध्या लिंबांचे दर तेजीत आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात हैदराबाद, तसेच चेन्नईतील शेतकऱ्यांनी लिंबे विक्रीस पाठविली आहेत. मुंबई, पुण्यातील बाजारात चांगले दर मिळत असल्याने दर वर्षी उन्हाळ्यात दक्षिणेकडील राज्यातून लिंबांची आवक होते, असे मार्केट यार्डातील लिंबांचे व्यापारी रोहन जाधव यांनी सांगितले.