लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील प्रतिविद्यार्थी प्रतिदिन आहार खर्चाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी ७४ पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी १ रुपया १२ पैसे वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ १ मार्चपासून लागू करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. पोषण आहारामध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार, तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिदिन प्रतिविद्यार्थी १०० ग्रॅम आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.
केंद्र सरकारने ७ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या आदेशाद्वारे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षातील १ ऑक्टोबर २०२२ पासून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी खर्चाच्या दरात ९.६ टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार १५ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्च मर्यादा पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये ४५ पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ रुपये १७ पैसे याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती. सद्य:स्थितीत केंद्र शासनाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिविद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे. त्यानुसार सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सुधारित आहार दरानुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ रुपये १९ पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ९ रुपये २९ पैसे दर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी ३ रुपये ८३ पैसे धान्यादी माल पुरवण्यासाठी, तर इंधन आणि भाजीपाला यासाठी २ रुपये ३६ पैसे, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिविद्यार्थी ५ रुपये ७५ पैसे खर्च धान्यादी माल पुरवण्यासाठी, इंधन आणि भाजीपाला यासाठी ३ रुपये ५४ पैसे अशाप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. शहरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ रुपये १९ पैसे, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ९ रुपये २९ पैसे याप्रमाणे अनुदान दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.