लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : जागतिक तापमानवाढीमुळे येत्या काळात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे संचालक (आयआयटीएम) डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी व्यक्त केला.

‘आयआयटीएम’मध्ये आयोजित कार्यशाळेच्या पार्श्वभूमीवर डॉ. कृष्णन यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत कमी वेळात जास्त पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडून पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या घटना घडत आहेत. हरित वायू उत्सर्जनामुळे तापमानवाढ होत आहे. दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त करताना तापमानवाढीचाही विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. त्याबाबत संशोधन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागही त्या अनुषंगाने विचार करत आहे. युनिफाइड अर्थ सिस्टीम हे प्रारूप तयार होत आहे.’

‘दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त करताना कमी वेळात जास्त पावसाच्या घटना नेमक्या पद्धतीने सांगता येत नाहीत. अशा घटनांचा अंदाज दोन दिवस आधी देणे शक्य आहे. त्यानुसार हवामान विभागाकडून इशारा देण्यात येतो. मात्र, अशा तीव्र घटनांमुळे विशेषतः शहरांमध्ये पाणी साचण्यासारख्या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जागतिक तापमानवाढीमुळे पावसाचे प्रमाण वाढतानाच तीव्रतेतही वाढ होत आहे. अधिक पाऊस होत असला, तरी पाण्याचे संवर्धन, पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष दिले पाहिजे,’ असे कृष्णन यांनी नमूद केले.

शहरीकरणाच्या परिणामांचा अभ्यास

गेल्या काही वर्षांत पुण्यातील काही भागांत कमाल तापमान अधिक नोंदवले जात आहे. वाढत्या शहरीकरणामुळे उष्णतेची शहरी बेटे तयार होत असल्याचे बोलले जाते. या अनुषंगाने अभ्यास करण्यासंदर्भात डॉ. कृष्णन म्हणाले, ‘अर्बन मेटिरिऑलॉजीचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यात प्रथम दिल्लीतील हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे. उष्णतेची शहरी बेटे अभ्यासण्यासाठी खूप सखोल निरीक्षणे असणे गरजेचे असते. त्या अनुषंगाने दिल्लीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करून शहरीकरणाचा परिणाम अभ्यासण्यात येणार आहे.’

दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त करताना एल निनो, एन्सो यासह आता कार्बनडाय ऑक्साइड, मिथेन अशा वायूंच्या उत्सर्जनाचाही विचार करावा लागणार आहे. हवामान बदल विचारात घेतल्याशिवाय दीर्घकालीन हवामान अंदाज व्यक्त करणे अवघड आहे, असे डॉ. कृष्णन यांनी सांगितले.

Story img Loader