पुणे : यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात पहिल्यांदाच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र खडकवासला धरण साखळी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली असून, सध्या दोन हजार ५६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत असल्याची माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाच्या उप विभागीय अभियंत्यांनी दिली.
हेही वाचा – पुणे: चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यात १ हजार ७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार आणि पाण्याच्या येव्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात आले.