राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनामध्ये सोळा वर्षांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार माध्यमिक शाळांतील शिक्षकांना घड्याळी तासिकांनुसार १२० रुपये, तर कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना १५० रुपये मानधन देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>खळबळजनक! चाकणमध्ये डोक्यात दगड घालून महिलेची हत्या

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातून एखाद्या विषयासाठी अर्धवेळ शिक्षकांसाठी आवश्यक असलेला कार्यभार उपलब्ध होऊ शकत नसल्यास संबंधित विषयांच्या अध्यापनासाठी अर्हताप्राप्त व्यक्तीची तासिका तत्वावर नियुक्ती करून त्यांना घड्याळी तासिकेनुसार मानधन देण्यात येते. माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील घड्याळी तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन २००६मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता सोळा वर्षांनी या मानधनाचे दर वाढवण्यास शासनाने मान्यता दिली. मानधनवाढीचा शासन निर्णय १ डिसेंबर २०२२पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: नवले पुलाजवळील सेवा रस्त्याचे काम अपूर्ण; सुप्रिया सुळे यांच्याकडून अपघातग्रस्त भागाची पाहणी

शासनाने केलेल्या सुधारित दरांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना १५० रुपये, तर माध्यमिकच्या शिक्षकांना १२० रुपये घड्याळी तासिकेसाठी दिले जातील. घड्याळी तासिका तत्वावर नियुक्त करण्यात येणारे शिक्षक पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे पात्रताधारक असावेत. पात्रतेचे निकष पूर्ण नसलेल्या शिक्षकांची घड्याळी तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येऊ नये, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

या पूर्वी माध्यमिकला ४२ रुपये आणि कनिष्ठ महाविद्यालयासाठी ७२ रुपये दर निश्चित केलेला होता. मात्र घड्याळी तासिका तत्त्वानुसार काम करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे शिक्षक मिळत नाहीत. आता दरवाढ केली असली, तरी प्रतिदिन अंदाजे २२५ ते ३०० रुपये मानधनावर शिक्षक काम करण्यास तयार होत नाहीत. कारण त्यांचे एकूण मानसिक मानधन आठ ते दहा हजार रुपयांच्या मर्यादेच होते. त्यामुळे त्यांचा ओढा खासगी शिकवणी वर्गांत शिकवण्याकडे असतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता तासिका तत्त्वानुसार मानधनाची रक्कम किमान चारशे रुपये असायला हवी.– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता, मुख्याध्यापक महामंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in remuneration of teachers working on hourly basis in schools and junior colleges pune print news amy