भक्ती बिसुरे
राष्ट्रीय आरोग्य अहवालातून उघड; ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मृत्युदर अधिक
राज्यातील तब्बल १८ हजार ७०७ नागरिकांना सर्पदंशाला सामोरे जावे लागले आहे. त्यांपैकी ३२ जणांचा मृत्यू झाला. सर्पदंशाची ही आकडेवारी २०१८ या वर्षांतील असून २०१७ च्या तुलनेत ती अडीच हजारांनी अधिक आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नुकताच २०१९ चा राष्ट्रीय आरोग्य अहवाल (नॅशनल हेल्थ प्रोफाइल – २०१९) प्रसिद्ध केला. या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालातून देशातील सर्व राज्यांची आरोग्यविषयक सद्य:स्थिती समोर आली आहे.
२०१७ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे १६ हजार ७०८ रुग्ण आढळले होते. त्यांपैकी नऊ हजार ७४९ रुग्ण पुरुष, तर सहा हजार ९५९ महिला होत्या. २०१७ मध्ये ३५ रुग्णांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये ही संख्या वाढून १८ हजार ७०७ एवढी झाली. त्यांपैकी अकरा हजार ४७६ रुग्ण पुरुष, तर सात हजार २८१ महिला आहेत. त्यातील ३२ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.
‘शहरातील डॉक्टरांना सर्पदंश प्रशिक्षण नाही’
सर्पदंशविषयक जनजागृतीत अग्रभागी असलेले डॉ. हिंमतराव बावस्कर म्हणाले, नव्वद टक्के साप हे बिनविषारी असतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नसते. राज्याच्या ग्रामीण भागात सर्पदंशविषयक जागृती करण्यात मोठय़ा प्रमाणावर यश आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक दंश करणारा साप किंवा त्याचे छायाचित्र काढून सोबत घेऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येतात. त्यांना तत्काळ उपचार मिळतात आणि रुग्णाचे प्राण वाचतात. शहरात मात्र हे चित्र वेगळे आहे. शहरात सर्पदंशाचे रुग्ण फारसे आढळत नाहीत. मात्र शहरातील डॉक्टरांचे सर्पदंशाविषयी प्रशिक्षण झालेले नसल्याने तेथील सर्पदंश रुग्णांचा मृत्युदर ग्रामीण भागापेक्षा अधिक आहे. सापाच्या संपर्कात येण्यासारखी शेतीची किंवा बाहेरील कामे पुरुष जास्त करत असल्याने रुग्णांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे.
प्रथमोपचार काय करावेत?
* सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चालवू नये.
* दंश झालेल्या ठिकाणी पट्टी बांधू नये किंवा खाणाखुणा करू नयेत.
* दंश केलेला साप किंवा त्याचे छायाचित्र काढून डॉक्टरांना दाखवण्यासाठी सोबत न्यावे.
* उपचारांसाठी मांत्रिकाकडे जाऊ नये.