पुणे : देशात सर्वदूर मोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे खरीप पेरण्यांनी वेग घेतला आहे. १५ जुलैअखेर देशात ५७५.१३ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. कापूस, सोयाबीन, भातासह कडधान्य आणि तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील खरीप लागवडीखालील सरासरी क्षेत्र ११०० लाख हेक्टर आहे. १५ जुलैअखेर ५७५.१३ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच काळात ५२१.२५ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी दहा टक्क्यांनी पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे.
पीकनिहाय, १५ जुलैअखेर भाताची लागवड ११५.६४ लाख हेक्टरवर झाली आहे. कडधान्याची पेरणी ६२.३२ लाख हेक्टरवर झाली आहे. त्यांपैकी तुरीची २८.१४ लाख हेक्टर आणि उडदाची १३.९० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याची लागवड ५८.८६ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबियांची लागवड १४०.४३ लाख हेक्टरवर झाली आहे. तेलबियांमध्ये सोयाबीनच्या लागवडीने मोठी आघाडी घेतली असून, १०८.१० लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. तिळाची लागवड ३.२१ लाख हेक्टरवर झाली आहे. उसाची लागवड ५७.६८ लाख हेक्टरवर झाली आहे. कापसाची लागवड ९५.७९ लाख हेक्टरवर झाली आहे. कापसाची खरिपातील लागवड सरासरी १२१ लाख हेक्टर इतकी आहे.
हेही वाचा…मुंबईसह किनारपट्टीवर चार दिवस कोसळधारा
देशभरात ऑगस्टअखेर पेरण्या होतात. त्यामुळे यंदा सरासरी ११०० लाख हेक्टरच्या पुढे खरीप पेरणी क्षेत्र जाण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने कडधान्ये, तेलबिया लागवडीला प्रोत्साहन दिल्यामुळे कडधान्य आणि तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. साधारण १५ जुलैपर्यंत कडधान्यांच्या पेरण्या फायदेशीर ठरतात, त्यामुळे यापुढे तूरवगळता अन्य कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.
हेही वाचा…पिंपरी- चिंचवड: अजित गव्हाणे यांच्यासह माजी आमदार विलास लांडेंचा उद्या शरद पवार गटात प्रवेश!
एकूण खरीप पेरणी क्षेत्र – ११०० लाख हेक्टर
पेरणी क्षेत्र – ५७५.१३ लाख हेक्टर
भात पेरणी क्षेत्र – ११५.६ लाख हेक्टर
सोयाबीन पेरणी क्षेत्र – १०८.१० लाख हेक्टर
कापूस पेरणी क्षेत्र – ९५.७९ लाख हेक्टर