मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात मागणी वाढल्याने फ्लॅावर, कोबी, गाजर, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (३१ जुलै) राज्य तसेच परराज्यातून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरहून ८ ते ९ टेम्पो गाजर, बेळगाव, धारवाडमधून ३ ते ४ टेम्पो मटार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १५ ते १६ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ५० ते ६० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.पुणे विभागातून सातारी आले १४०० ते १५०० गोणी, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो १३ ते १४ हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग १०० गोणी, कांदा ५० ते ६० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

कोथिंबिर, कांदापात, करडई, राजगिऱ्याच्या दरात वाढ

मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी झाली असून कोथिंबिर, कांदापात, करडई, राजगिऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. मेथी आणि शेपुच्या दरात घट झाली आहे. चाकवत, पुदिना, अंबाडी, मुळा, चुक्याचे दर स्थिर आहेत. रविवारी घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या ९० हजार जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात कोथिंबिरेच्या जुडीमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापातीच्या जुडीमागे २ रुपये, करडई आणि राजगिऱ्याच्या जुडीमागे एख रुपयांनी वाढ झाली आहे. मेथी आणि शेपुच्या दरात जुडीमागे २ रुपयांनी घट झाली आहे.

उपवासासाठी फळांना मागणी
श्रावण महिन्यातील उपवासासाठी फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. पपई, चिकू, खरबूज, लिंबांच्या दरात वाढ झाली आहे. अननस, कलिंगड, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरुचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. फळबाजारात लिंबे दीड ते दोन हजार गोणी, डाळिंब ५० ते ६० टन, पपई २० ते २५ टेम्पो, कलिंगड १० ते १५ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, पेरु ५०० ते ६०० क्रेट (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

श्रावणात फुलांना मागणी
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फुलांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून चांगल्या प्रतीच्या फुलांना मागणी वाढली आहे.

मासळीच्या मागणीत घट

श्रावणात सामिष खाद्यपदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. मटण, मासळी, चिकन, अंड्यांच्या मागणीत घट झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत मासळीची आवक कमी झाली आहे. गणेश पेटेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी ४ ते ५ टन, खाडीतील मासळी ५० ते १०० किलो, नदीतील मासळी १०० ते २०० किलो अशी आवक झाली, असे मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the price of cauliflower cabbage carrot chilli pune print news amy