लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : नवरात्रोत्सवामुळे फळभाज्यांना बेताची मागणी आहे. आवक कमी झाल्याने कांदा, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, बीट या फळभाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२२ ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यांतून ९० ते ९५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे फळभाज्यांना मागणी बेताची आहे. दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या मागणीत वाढ होईल. गुजरात, कर्नाटकमधून ७ टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटकमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदूरमधून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ६ ते ७ टेम्पो लसूण, आग्रा, इंदूर, तसेच पुणे विभागातून मिळून ६० ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.
आणखी वाचा-पिंपरी महापालिकेकडून मालमत्ता कराची २०० कोटींची थकबाकी वसूल, जप्त मालमत्तांचा लिलाव
पुणे विभागातून सातारी आले ६०० ते ७०० गोणी, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ४ ते ५ टेम्पो, कांदा ६० ट्रक अशी आवक झाली.
पालेभाज्यांचे दर स्थिर
नवरात्रोत्सवातील उपवासामुळे पालेभाज्यांच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दीड लाख जुडी, मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.
आणखी वाचा-VIDEO: राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीत शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर
घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर कोथिंबीर १५०० ते २५०० रुपये, मेथी २००० ते २२०० रुपये, शेपू ६०० ते १००० रुपये, कांदापात ६०० ते १२०० रुपये, चाकवत ४०० ते ७०० रुपये, करडईस३०० ते ६०० रुपये, पुदिना ३०० ते ८०० रुपये, अंबाडी ४०० ते ७०० रुपये, मुळा ८०० ते १५०० रुपये, राजगिरा ४०० ते ८०० रुपये, चुका ६०० ते ७०० रुपये, चवळई ३०० ते ७०० रुपये, पालक १२०० ते १८०० रुपये असे होते.