मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गाजर, काकडी, कोबी या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (३० ऑक्टोबर) राज्य; तसेच परराज्यांतून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ते १२ ट्रक हिरवी मिरची, कर्नाटकातून ४ टेम्पो कोबी, तामिळनाडूतून ४ टेम्पो शेवगा, आंध्रप्रदेश आणि इंदूरहून मिळून २ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून ७ लसूण, गुजरातमधून २ टेम्पो भुईमुग शेंग, आग्रा, इंदूर तसेच पुणे विभागातून मिळून ५० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे : रोडावणारा वाङ्मयीन व्यवहार ही चिंतेची बाब – डाॅ. सुधीर रसाळ

पुणे विभागातून सातारी आले १००० ते १२०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची ८ टेम्पो, टोमॅटो आठ ते दहा हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार १०० गोणी, कांदा ७० ट्रक अशी आवक झाली.

कोथिंबीर, करडईच्या दरात वाढ
मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर,करडई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. अन्य पालेभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. तरकारी विभागात काेथिंबिरीच्या दोन लाख जुडी; तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

हेही वाचा >>>मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा गजाआड; पाच दुचाकी जप्त

फळांची आवक वाढली
मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक वाढली. फळबाजारात लिंबू दीड हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई १५ टेम्पो, कलिंगड १ ते २ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, पेरु २० टन, अननस ४ ट्रक, मोसंबी ७० टन, संत्री २५ टन, सीताफळ ४० टन, चिकू ६०० पेटी अशी आवक झाली, अशी माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.

पापलेट, सुरमई, हलवा, रावसच्या दरात वाढ
थंडीमुळे गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. दिवाळीनंतर मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. पापलेट, सुरमई, रावस, हलवा या मासळीच्या दरात वाढ झाली झाली आहे. चिकन, मटणचे दर स्थिर आहेत, अशी माहिती चिकन व्यापारी रुपेश परदेशी अणि मटण व्यापारी प्रभाकर कांबळे यांनी दिली. शेकडा गावरान अंड्यांच्या दरात ५० ते ६० रुपयांनी वाढ झाली. इंग्लिश अंड्यांच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली आहे. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी ८ ते १० टन, खाडीतील मासळी २०० ते ४०० किलो, नदीतील मासळी ५०० ते ७०० किलो, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची १४ ते १५ टन आवक झाल्याची माहिती मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली.

हेही वाचा >>>दारु पिताना झालेल्या वादातून चुलतभावाचा खून; एकाला अटक

फुलांच्या मागणीत घट
दिवाळीनंतर फुलांच्या मागणीत घट झाली आहे. पावसामुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला असून झेंडूचे दर स्थिर आहेत. अन्य फुलांच्या दरात घट झाली असल्याचे मार्केट यार्डातील फूल व्यापारी सागर भोसले यांनी सांगितले.