पुणे : भारतीय जनता पक्षाचा सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतटक्का वाढल्याने मताधिक्याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपच्या पारंपरिक मतदारांनी सकाळीच केलेले मतदान, दुपारी काहीशी थंडावलेली मतदानप्रक्रिया आणि शेवटच्या टप्प्यात झोपडपट्टी परिसरातील मतदारांची झालेली गर्दी असे चित्र या मतदारसंघात दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झपाट्याने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरूडकडे पाहिले जाते. कसबा मतदारसंघानंतर कोथरूड मतदारसंघ भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे माजी गटनेते किशोर शिंदे यांच्यात तिरंगी लढत होणार असली, तरी भाजप आणि शिवसेना यांच्यातच खरी लढत आहे. सन २०१४मध्ये भाजपच्या ताब्यात गेलेला हा मतदारसंघ खेचण्यासाठी शिवसेना उत्सुक असून, सलग तिसऱ्या वेळी हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

हेही वाचा >>>मावळमध्ये मतदानाचा उच्चांक कोणाला मारक?

या मतदारसंघात सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या हक्काचे मतदान दुपारपर्यंत पूर्ण झाल्याचे दिसून आले. मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर काही मतदान केंद्रांत तांत्रिक बिघाड झाले. विद्युतव्यवस्था खंडित झाल्याने मतदानाला उशिरा प्रारंभ झाला. हा अपवादवगळता अन्य कोणत्याही अडथळ्याविना मतदान झाल्याने पहिल्या दोन तासांतच ६.५० टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाची टक्केवारी दुपारी एकपर्यंत वाढली. मात्र, त्यानंतर एक ते चार या कालावधीत मतदान कमी झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४७.४२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात ४८.२० टक्के मतदान झाले होते. त्यामुळे हा वाढलेला मतटक्का कोणाच्या फायद्याचा, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

केंद्रीय सहकारमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि राज्याचे विद्यमान मंत्री, उमेदवार चंद्रकांत पाटील या मतदारसंघातील आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत जाळे, भाजपचे संघटन येथे मोठ्या प्रमाणावर असल्याने भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील अनेक मतदारांची नावे वगळल्याच्या, दर निवडणुकीत एकाच केंद्रावर मतदान होत असतानाही केंद्र बदलल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत हा प्रकार फारसा दिसला नाही. पहिल्या टप्प्यात सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच नवमतदारांमध्येही मतदानासाठी उत्साह दिसला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in vote percentage in kothrud assembly constituency there is also interest in the voter turnout pune print news apk 13 amy