रेल्वेच्या पुणे विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये मागील वर्षांच्या तुलनेमध्ये तब्बल ६७ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत पुणे विभागाला ५८४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. याच कालावधीत मागील वर्षी ५१७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते.
रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील काही वर्षांपासून प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. लांब पल्ल्याच्या नव्या गाडय़ा सुरू करण्यात आल्या. त्याचप्रमाणे गाडय़ांना होणारी गर्दी लक्षात घेता जादा डबेही जोडण्यात आले. प्रवाशांची वाढ लक्षात घेता मागील काही वर्षांपासून विभागाच्या उत्पन्नामध्ये सातत्याने वाढ नोंदविण्यात येत आहे. रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक सुनीत शर्मा यांनी नुकतीच वाढलेल्या उत्पन्नाबाबत माहिती दिली. मागील वर्षांच्या तुलनेत रेल्वेचे उत्पन्न १३ टक्क्य़ांनी वाढले आहे, असे त्यांनी सांगितले.
वर्षभरातील कामांची माहिती देताना शर्मा यांनी सांगितले की, वाढलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता वर्षभरात ९२७ अतिरिक्त डबे जोडण्यात आले. पुणे स्थानकावर संगणकीकृत आरक्षण खिडकी रविवारीही दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेत सुरू ठेवण्यात आली आहे.  स्थानकावर गाडय़ांची माहिती देणारे डिजिटल फलक बसविण्यात आले. त्याचप्रमाणे प्रवाशांना बसण्यासाठी ५० अतिरिक्त बाकडे लावण्यात आले. त्याचप्रमाणे पुणे व कोल्हापूर स्थानकावर नवीन पादचारी पूल व पुणे स्थानकासाठी पार्किंगची नवी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.
वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. अलोक बडकुल, समितीचे सदस्य सीमा भाकरे, विकास देशपांडे, सुरेश धर्मावत, मारुतराव कातवरे, कृष्णराव आवटे, राजेंद्र दोशी, हेमंत टपाले, पोपट भेगडे, सुरेश दीनकर वाडकर, पोपट लोणकर, शिवसदन नायर, राधेश्याम मिश्रा, राजेंद्र वाकडे, दीपक बोरा, सुदर्शन कदम आदी बैठकीला उपस्थित होते. हडपसरमध्ये नवीन टर्मिनल, सिंहगड व भुसावळ एक्स्प्रेसला तळेगावमध्ये थांबा, स्थानकातील पार्किंग व्यवस्थेत सुधारणा आदी मागण्या सदस्यांनी बैठकीत केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा