पुणे : आपल्या पूर्वजाचा आहारात नाचणी, बाजरी, ज्वारीसह अन्य तृणधान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. हरित क्रांतीनंतर गहू, तांदूळ आहारातील महत्वाचे घटक झाले; पण तृणधान्येच आपला मुख्य आणि पारंपरिक आहार आहे. तृणधान्ये आपल्याला निरोगी ठेवतात. त्यामुळे तृणधान्यांचा आहारातील वापर वाढवा आणि दीर्घायू व्हा, असा मंत्र मास्टरशेफ नताशा गांधी यांनी दिला. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आलेल्या नताशा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
भारतीय लोक दीर्घायु होते, कारण त्यांच्या आहारात त्या-त्या स्थानिक वातावरणात उत्पादित होणाऱ्या तृणधान्यांचा समावेश होता. तृणधान्यांमुळेच भारतीय लोक निरोगी, काटक, चपळ होते, ताकदीच्या जोरावर त्यांनी युद्धे जिंकली. पण, काळाच्या ओघात आपल्या आहारात गहू, तांदळाचे महत्त्व वाढले आणि भारतीय मधूमेह, उच्च रक्तदाबा सारख्या आजारांनी त्रस्त झाले. या रोगपासून मुक्ती हवी असेल, निरोगी राहयचे असेल तर तृणधान्याला पर्याय नाही. यंदाचे वर्ष जागतिक तृणधान्ये वर्ष आहे, म्हणून फक्त याच वर्षी तृणधान्ये खायची नाहीत तर यापुढे आपणा सर्वांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश असला पाहिजे, असेही नताशा गांधी म्हणाल्या.