मुळशी, मावळात गेल्या काही वर्षांत जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मावळातील कष्टकऱ्यांच्या हाती पैसा आला, जमीनविक्रीतून आलेल्या बक्कळ पैशामुळे सुबत्ता आली आणि सुबत्तेबरोबरच मुळशी तालुका, वडगाव मावळ तालुक्यातील तळेगाव तसेच चाकण भागात वेगाने औद्योगिकीकरणही सुरू झाले. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधील विविध कामांचे ठेके, जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार यात स्थानिक तरुण मुले उतरली. पाठोपाठ राजकीय झूल पांघरून फिरणाऱ्या दादा-भाऊंचा या भागात सुळसुळाट झाला. राजकीय वर्चस्व आणि व्यवहारातील वाद यातून भरदिवसा खून तसेच एकमेकांना संपवण्यासाठी गुंडांना ‘सुपारी’ देण्याचे प्रकार सुरू झाले. तळेगावमधील भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा गेल्या आठवडय़ात (१६ ऑक्टोबर) निर्घृण खून झाल्यानंतर या भागातील वातावरणात तणाव आणि दहशतदेखील आहे. गुन्हेगारी का वाढली?
मुळशी-मावळ भागातील माणूस कष्टकरी म्हणून ओळखला जातो, मात्र गेल्या दोन दशकांत या भागाचा वेगाने विकास झाला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगत असलेल्या पिंपरी-चिंचवड, तळेगाव, देहूरोड, वडगाव, सोमाटणे फाटा, कामशेत ते लोणावळा या पट्टय़ांतील जमिनी पुणे-मुंबईतील उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केल्या. तळेगाव, पिरंगुट, चाकण येथील औद्योगिक वसाहतीत बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचे कारखाने सुरू केले. या कंपन्या आल्यानंतर तेथील भंगार मालाची विल्हेवाट, कॅन्टीनचा ठेका, कामगार पुरवण्याचे काम यात स्थानिक तरुण उतरले. साधारणपणे वीस वर्षांपूर्वी या भागाक डे मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांचे लक्ष गेले. त्यांनी स्थानिक गुंडांना हाताशी धरून तेथे बस्तान बसवले. पुढे मुंबईतील संघटित गुन्हेगारी टोळ्यांचे पोलिसांनी कंबरडे मोडल्यानंतर त्या भागातील गुंडांनी स्वत:च्या टोळ्या स्थापन केल्या. राजकारणात बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना राजकीय पक्षांमध्ये स्थान हवे होते. त्यामुळे अनेक गुंड टोळ्यांमधील सराईत राजकीय पक्षांच्या आश्रयाला गेले. पोलिसी कारवायांपासून वाचवण्यासाठी राजकीय पक्षांची झूल पांघरून वावरणारे काही गुंड तळेगाव, लोणावळा नगरपालिकेचे नगराध्यक्षही झाले.
जमीन खरेदी-विक्री व्यवहारातून आलेल्या पैशामुळे एक प्रकारची मस्ती आली. त्यातून जमीनविक्री व्यवहारात अडसर ठरणाऱ्यांचा काटा काढण्याचे सत्र सुरू झाले. तळेगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी वडगाव मावळ तसेच लोणावळा भागातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांचा पाठपुरावा केला. हा पाठपुरावा त्यांच्या जिवावर आला. त्यातून त्यांचा तळेगावात भरदिवसा निर्घृण खून झाला. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणात तळेगावातील गुंड श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र आरोप न्यायालयात टिकला नाही. श्याम दाभाडेला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तेव्हापासून तो फरार झाला. त्यानेच तळेगावचे माजी नगराध्यक्ष बापू भेगडे यांच्या खुनाचा कट रचल्याचे पंधरा दिवसांपूर्वी उघड झाले होते. या प्रकरणात दाभाडेच्या साथीदारांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले. दरम्यान, पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज असलेल्या दाभाडेने गेल्या आठवडय़ात तळेगावात भरदिवसा भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा खून केला. शेळके खूनप्रकरणात दाभाडेसह अकरा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. मात्र दाभाडे अद्याप पकडला गेलेला नाही.
मुळशी-मावळातील गुन्हेगारी टोळ्या
- शरद मोहोळ (मुळशी, पुणे शहर)
- गजानन मारणे (मुळशी, पुणे शहर)
- गणेश मारणे (मुळशी, पुणे शहर)
- श्याम दाभाडे (मुळशी, पुणे शहर)
- अमीन शेख (देहूरोड)
- महाकाली टोळी (देहूरोड)
- नीलेश घायवळ (मुळशी, पुणे शहर)
- भंडलकर टोळी (चाकण)
- बाबा बोडके (पुणे शहर, मुळशी, भोर, वेल्हा)
- रोहिदास चोरगे (वेल्हा, पुणे शहर)
कोण हा श्याम दाभाडे
तळेगाव दाभाडे भागात दाभाडे, भेगडे आणि टकले कु टुंबीयांचे वर्चस्व आहे. श्याम दाभाडेविरुद्ध गंभीर अकरा गुन्हे दाखल आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खूनप्रकरणात त्याला अटकदेखील करण्यात आली होती. सध्या शेट्टी खूनप्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू आहे.