पुणे : महागाई हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी निगडित विषय आहे. त्यावर फार बोलल्याने काही उपयोग होत नाही. दहा वर्षांपूर्वी ४० हजारांचा मोबाइल, आज ८० हजार रुपयांना मिळतो. यावरून गेल्या दहा वर्षांत महागाईचा दराच्या तुलनेत तो स्वस्तच आहे, हे आम्ही घरोघरी जाऊन लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. देशात वाढलेली महामागाई ही जगाच्या तुलनेत कमीच आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केला.

पुणे दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘महागाईबाबत जनतेमध्ये जाऊन त्यांच्याशी पक्षाकडून संवाद साधला जाणार आहे. जगाच्या तुलनेत देशातील महागाई कमी आहे, हे जनतेला पटवून दिले जाणार आहे.’       भारत जोडो यात्रेबाबत बावनकुळे म्हणाले, की एकीकडे राहुल यांची यात्रा सुरू आहे. दुसरीकडे कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. ही यात्रा नेत्यांची झाली आहे. नेत्यांच्या मुलांना पुढे आणण्यापुरती ही यात्रा मर्यादित राहिली आहे. अडीच वर्षे सत्ता असूनही कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. राहुल गांधी यात्रेत येऊनही त्यांना काही फायदा होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील हे न्यायालय आणि निवडणूक आयोग ठरवेल. न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सन २०११ नुसार प्रभागरचना करायला पाहिजे. इतर मागास प्रवर्गाबाबत (ओबीसी) न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यामुळे याचा निर्णय होत नाही, तो पर्यंत निवडणुका होणार नाहीत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसची आम्हाला कोणतीही गरज नाही. शिंदे-फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितल्यास आमदारांची संख्या १६४ वरून १८७ होईल, असे सांगून बावनकुळे म्हणाले, की राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेशिवाय करमत नाही.

Story img Loader