पुणे : सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशांसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर चुरस असेल. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षेच्या (नीट) निकालात ‘गुण’वंतांची संख्या प्रचंड वाढल्याने ‘नीट’मध्ये उत्तम गुण मिळवलेल्यांनाही सरकारी महाविद्यालयांतील प्रवेश दूरचा ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे (एनटीए) मंगळवारी ‘नीट’चा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख १६ हजार २६८ विद्यार्थ्यांना प्रवेशास पात्र ठरण्याएवढे म्हणजे १६४ किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत. या परीक्षेत देशात ६७ विद्यार्थ्यांनी ९९.९९ पर्सेंटाइल म्हणजे ७२० गुणांसह पहिला क्रमांक मिळवला आहे. त्यात राज्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘नीट’साठी मार्गदर्शन करणारे दुर्गेश मंगेशकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७२० पैकी ७१५ पेक्षा अधिक गुण मिळालेले १९ विद्यार्थी होते. यंदा २२५ विद्यार्थ्यांना ७१५ पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी ३४७ विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण मिळाले होते, ती संख्या यंदा तब्बल २२५० आहे.
हेही वाचा…आढळरावांना ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांनीच रोखले?
गुणांमध्ये झालेली वाढ साहजिकच सरकारी महाविद्यालयांतील स्पर्धा वाढविणारी ठरणार आहे. राज्यात सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालये आणि अभिमत विद्यापीठांत मिळून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या सुमारे १० हजार जागा आहेत. विद्यार्थ्यांना प्रामुख्याने सरकारी महाविद्यालयांत प्रवेश हवा असतो. त्यासाठी देशभरातून स्पर्धा असते. ‘नीट’मध्ये वाढलेली ‘गुण’वत्ता ही स्पर्धा आणखी तीव्र करील.
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने २०२३-२४ मधील शासकीय महाविद्यालयांच्या प्रवेशांबाबत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये ७२० पैकी ६३८ गुणांवर शेवटचा प्रवेश झाला, तर पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील खुल्या गटातील शेवटचा प्रवेश ६४७ गुणांवर झाला. यंदा विद्यार्थ्यांना मिळालेले गुण पाहता, राज्यातील या दोन प्रमुख सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील ‘कट ऑफ’ यंदा आणखी वर जाण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा…शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला धोक्याचा इशारा; मताधिक्य घटल्याचा काँग्रेसला फायदा
यंदाच्या परीक्षेत काही प्रमाणात अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करता आला. त्याशिवाय प्रश्नपत्रिकाही तुलनेने सोपी असल्याने विद्यार्थ्यांना त्याचाही फायदा झाला. मात्र, देशात ६७ विद्यार्थी पहिल्या क्रमांकावर असणे ही बाब चांगली बाब नाही. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने परीक्षेची काठिण्यपातळी टिकवणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञ मार्गदर्शक हरिश बुटले यांनी मांडले.
‘नीट’मधील वाढलेल्या गुणांमुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठीचे गुण निश्चितपणे वाढतील. विद्यार्थ्यांचे वाढलेले गुण हा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा परिणाम आहे, की ‘योगायोग’, हा अभ्यासाचा विषय आहे, असे तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले.