पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात स्वाईन फ्लूखालोखाल इतर तापाच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. यात जूनपासून डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून चिकुनगुनियाचा ताप मात्र या वर्षी विशेष आढळून आलेला नाही.  
या चारही तापाच्या लक्षणांमध्ये काही प्रमाणात साम्य आढळत असल्यामुळे लक्षणांबद्दल रुग्णांमध्ये संभ्रम आढळत आहे. आतापर्यंत शहरात ३४ जणांचा स्वाईन फ्लूमुळे बळी गेला असून यातील ८ रुग्ण पुण्यातील तर २६ रुग्ण बाहेरून उपचारांसाठी आले होते. विशेषत: पुण्याबाहेरून उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये उपचारांना विलंब झाल्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण महानगरपालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस. टी. परदेशी यांनी नोंदवले.
डॉ. परदेशी म्हणाले, ‘‘सर्व तापाची लक्षणे साधारणपणे सारखीच दिसत असल्यामुळे ताप आला की तो कोणत्या प्रकारचा असेल याबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. विशेषत: पुण्याबाहेरून स्वाईन फ्लूच्या उपचारांसाठी आलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे स्वाईन फ्लूची असल्याचे ओळखू न आल्यामुळे उपचारांना विलंब केल्याचे दिसून येते. स्वाईन फ्लूमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचे महापालिकेचे लक्ष्य असून त्यासाठी फ्लूसदृश लक्षणे दिसल्यावर लगेच रुग्णाची एच१ एन१ साठी चाचणी करण्याचे निर्देश वैद्यकीय व्यावसायिक आणि शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.’’
१ जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाईन फ्लूचे २३० रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २२४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. गेल्या वर्षभरात एकूण १०८५ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. या वर्षी जानेवारीत डेंग्यूचे ३६ रुग्ण आढळले होते. फेब्रुवारी, मार्चमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अनुक्रमे १८ आणि २३ अशी होती. एप्रिल आणि मे महिन्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी झाला. जूनपासून या संख्येत लक्षणीय वाढ होऊ लागली. जूनमध्ये डेंग्यूचे ३६, तर जुलैमध्ये ४४ रुग्ण आढळले होते.
स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या तुलनेत मलेरियाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत असले तरी त्यांच्या संख्येतही जूनपासून वाढ दिसत आहे. जूनमध्ये या रुग्णांची संख्या १५, तर जुलैत ती १८ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत ९२ जणांना मलेरिया झाला असून गेल्या वर्षी मलेरियाचे एकूण १४१ रुग्ण आढळले होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दर महिन्याला चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या शहरात नगण्य आहे. गेल्या वर्षी एकूण ३० जणांना चिकुनगुनिया झाला असून या वर्षी आतापर्यंत १० रुग्ण आढळले आहेत.
ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. डी. बी. कदम यांनी या चार तापांच्या लक्षणांमधील ठळक फरक सांगितले.
तापाचा प्रकार व ठळक लक्षणे पुढीलप्रमाणे-
१. स्वाईन फ्लू-    सतत तीव्र ताप, घसा दुखणे, सर्दी
२. डेंग्यू-        तीव्र अंगदुखी, अंगावर पुरळ उठणे, अंगावर लाल चट्टे पडणे, घसादुखी नाही
३. मलेरिया-    राहून-राहून आणि थंडी वाजून येणारा ताप
४. चिकूनगुन्या-    ताप, तीव्र सांधेदुखी, अंगावर लाल पुरळ उठणे

Story img Loader