पुणे : जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, बिबट्या निवारा केंद्रावरदेखील ताण वाढला आहे. याशिवाय नव्या निवारा केंद्रांचे प्रस्तावदेखील जागेअभावी प्रलंबित आहेत. परिणामी, बिबट्यांची संख्या वाढत असल्याने नागरी वस्तीत हल्ले वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर वन आणि महसूल विभागाने तातडीने प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावावेत. रिलायन्स समूहाने गुजरातमधील जामनगर येथे ‘वनतारा’ या वन्य प्राण्यांची काळजी व संवर्धन प्रकल्पास किंवा इतर केंद्रांना पाहिजे असल्यास नियमानुसार कार्यवाही करून पुणे जिल्ह्यातील बिबटे द्यावेत, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली.

जखमी झालेल्या आणि कायमस्वरूपी विकलांग झालेल्या बिबट्यांना उपचारासाठी जुन्नरमधील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात आणण्यात येते. या केंद्राची क्षमता ४० एवढी आहे. अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. बिबट्यांकडून हल्ल्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. नुकतेच जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जुन्नर तालुक्यातील गावे ‘बिबट आपत्तीप्रवण क्षेत्र’ म्हणून जाहीर केली आहेत. या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यात नव्याने बिबट्या निवारा केंद्राच्या रखडलेल्या प्रस्तावाबाबत स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत प्रश्न उपस्थित केला. त्यावर चर्चा होऊन पालकमंत्री पवार यांनी, अतिरिक्त बिबटे नियमानुसार आणि गरज असल्यास ‘वनतारा’ प्रकल्पात पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना केली.

हेही वाचा…शहरबात : पिंपरी-चिंचवडला सुरक्षित ठेवावेच लागेल!

दरम्यान, जुन्नर आणि आंबेगाव या केवळ दोन तालुक्यांत बिबट्यांची संख्या ६०० पेक्षा अधिक आहे. त्यामुळे या तालुक्यात नव्याने बिबट्या निवारा केंद्र आणि जखमी वन्य प्राण्यांवर उपचार केंद्र उभारण्याबाबत वन विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावित जागा जलसंपदा विभागाची असून, जलसंपदा विभागाला जागेबाबत मागणी केली. मात्र, आतापर्यंत अपेक्षित कार्यवाही झाली नसून, महसूल विभागाकडे देखील याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे निवारा केंद्र रखडले असून, बिबट्यांचा वावर मानवी वस्तीत वाढून हल्ले होत असल्याच्या तक्रारींवर डीपीसी बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

हेही वाचा…शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

अंबानींच्या विवाह सोहळ्यावर पालकमंत्री पवार यांची कोटी

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. या बहुचर्चित विवाह सोहळ्याची समाजमाध्यमांवरदेखील मोठी चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डीपीसी बैठकीत ‘तुम्हाला सर्वांना माहिती असेल, हा छोटासा विवाह सोहळा पार पडला’, अशी कोटी केली आणि बैठकीत एकच हशा पिकला.