ज्ञानेश भुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Loksatta Pune Vardhapan 2023 : पुणे शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिकसारख्या अनेक गोष्टींचा वारसा लाभला आहे. शहराचा भौगोलिक विस्तारही वाढला आहे. अनेक आघाड्यांवर पुणे केंद्रस्थानी येऊ लागले आहे. कारकीर्द घडविण्याच्या अनेक वाटा पुण्यात येतात किंवा पुण्यातून पुढे जातात. नव्या सहस्रकातील २३ वे वर्ष असताना खेळ आणि खेळाडूंभोवती फिरणाऱ्या संधीदेखील वाढल्या आहेत. क्रीडा क्षेत्र पुण्याभोवती रेंगाळू लागले आहे असे म्हटले तरी चालेल. खेळ किंवा खेळाडूसाठी केवळ आर्थिक निधीच आवश्यक नाही, तर उत्स्फूर्त प्रोत्साहनाची गरज आहे.

हेही वाचा- बँकिंग क्षेत्रात आधुनिकता, पारंपरिकतेचा संगम

क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडत नाही किंवा क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासारखे काय आहे? हा प्रश्न आता काळाच्या ओघात खूप मागे राहिला आहे. खेळाडूशिवायही क्रीडा क्षेत्रात काही करता येते आणि तशा अनेक वाटा, संधी येथे उपलब्ध आहेत ही मानसिकता रुढ व्हायला लागली आहे. त्यामुळेच आज पुण्यात खेळाडू म्हणून कारकीर्द घडवू शकले नसूनही, केवळ खेळाची आवड म्हणून त्यात काम करताना दिसत आहेत. शहरात वाढलेल्या क्रीडा स्पर्धा हे त्याचे उदाहरण देता येईल. क्रीडा क्षेत्रात खेळाडू म्हणूनच नाही, तर त्याच्या अनुषंगाने अन्य आघाड्यांवरही कारकीर्द घडवता येते, हे आजच्या पिढीला समजून चुकले आहे. कदाचित म्हणूनच खेळाडू म्हणून फारशी संधी मिळाली नाही, तर खेळाडूच आपल्याच खेळातील उपलब्ध नव्या वाटा शोधताना दिसतात. त्यामुळेच खेळाडूही खेळानंतर पंचाच्या भूमिकेत न जाता आपल्या क्रीडा ज्ञानाच्या कक्षा स्वतःहून रुंदावत आहे. आपल्याच खेळात अनेक नवे प्रयोग तो करू पाहत आहे. आयपीएलने सुरू केलेली लीग आता नुसती लीग राहिलेली नाही, तर क्रीडा प्रसारातील एक चळवळ होऊन बसली आहे, असे म्हटले तर चूक ठरू नये. हे सगळे बदल पुण्याने पाहिले आहेत.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : पुणे प्रारूप : समृद्ध आर्थिक शक्तिस्थळ निर्माणाचे धडे

पुण्याचा देदीप्यमान इतिहास

क्रीडा क्षेत्रात पुण्याने काय पाहिले नाही, बॅडमिंटन खेळाची सुरुवात येथेच झाली, भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मुहूर्तमेढ पुण्यातच रोवली गेली, पहिला ऑलिम्पिक संघ येथेच निवडला गेला. देशाच्या राज्याच्या क्रीडा वैभवात भर घालणारी पिढीही पुण्याने दिली. सर्वाधिक ऑलिम्पिक स्पर्धा खेळणारा पहिला हॉकीपटू धनराज पिल्ले पुण्याचाच, पहिल्या भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघाची उपकर्णधार रेखा भिडे पुण्याचीच, कबड्डीला वलय निर्माण करणारा शांताराम जाधव, खो-खो मध्ये शिवछत्रपती, अर्जुन एकाच वर्षी मिळविणारा आणि पुढे प्रशिक्षक म्हणूनही गौरव होणारा श्रीरंग इनामदार हे देखील पुण्याचेच. कुस्तीमध्ये एकापेक्षा एक सरस मल्ल देणारे हरिश्चंद्र बिराजदार आणि त्यांची हरिश्चंद्राची फॅक्टरी ही देखील पुण्यातीलच, ऑलिम्पिक खेळणारे गोपाळ देवांग, मनोज पिंगळे हे बॉक्सर पुण्यानेच दिले. खो-खो खेळातील सर्वाधिक अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू पुण्यातीलच, वेटलिफ्टिंगमध्ये जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी हर्षदा गरुड, युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती देविका घोरपडेही पुण्याचीच खेळाडू, देशातील अद्ययावत क्रीडा संकुल पुण्यातच उभे राहिले. आज या एकाच क्रीडा संकुलाच्या निर्मितीनंतर पुण्यातील क्रीडा क्षेत्राच्या वाटा रुंदावल्या हेच खरे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : हेल्दी पुणे, स्मार्ट पुणे

रुंदावलेल्या कक्षा

कारकीर्द घडविण्याच्या अनेक वाटा पुण्यात येतात किंवा पुण्यातून पुढे जातात. नव्या सहस्रकातील २३ वे वर्ष असताना खेळ आणि खेळाडूंभोवती फिरणाऱ्या संधीदेखील वाढल्या आहेत. या सगळ्यामुळे पुण्यातील खेळाडू खेळात कारकीर्द घडविण्याच्या वाटा शोधू लागला. शिक्षणाच्या कक्षाही रुंदावल्या आणि विविध पर्याय उपलब्ध झाल्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करून तो बरोबरीने शिक्षणही पूर्ण करू लागला आहे. पालकांच्या दडपणामुळे खेळापासून आता तो लांब रहात नाही. स्वतःच आपल्या वाटा शोधू लागला आहे. सपोर्ट स्टाफ ही बदलत्या क्रीडा क्षेत्रातील परवलीचा झालेला शब्द. यामध्ये मुख्य प्रशिक्षक, सहायक प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ, फिजीओ, परफॉर्मन्स ॲनालिस्ट, संगणक तज्ज्ञ, आकडेवारी तज्ज्ञ, क्युरेटर, मसाजर, समालोचक अशा अनेक वाटांवरून खेळाडू आता चालू लागले आहेत. पुण्यातील अव्वल खेळाडूंचा खेळ बघत पुण्यातील एक नवी पिढी दिली. मनोज पिंगळे, गोपाळ देवांगसारखे माजी खेळाडू प्रशिक्षकाच्या भूमिकेतून खेळाडू घडवत आहेत. आता हे प्रमाण भविष्यात वाढण्याची गरज आहे. यासाठी खेळाडू, पालक, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांनी विचार करण्याची गरज आहे. पुणे शहराने क्रीडा क्षेत्रात जरुर भरारी घेतली आहे. पण, ही नुसती भरारी न राहता त्याची गरुडझेप होण्याची गरज आहे. याची सुरुवात शालेय जीवनापासून करण्यात येईल. शाळांमधील मैदाने कायम राहतील, सराव करावा लागेल, उपलब्ध सुविधा अद्ययावत कराव्या लागतील, स्पर्धांचे प्रमाण वाढवावे लागेल आणि यात निष्पक्षपातीपणा आणावा लागेल, तर इतर शहरांपेक्षा पुणे क्रीडा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकेल.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था

सकारात्मक दृष्टिकोनाची गरज

या सगळ्यांसाठी ठोस त्यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. गुणवत्ता शोधून तळागाळातून सर्वोत्तम खेळाडूचा शोध कसा घेता येईल यासाठी परिपूर्ण नियोजन राबविण्याची गरज आहे. पुण्यात मिळणाऱ्या सुविधा वाढतील कशा आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येईल. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जा कसा उपलब्ध होईल यावर भर द्यावा लागेल. आज पुण्यात पहिल्या क्रीडा विद्यापीठाची निर्मिती होत आहे. त्याचा वापर त्यापेक्षा त्या विद्यापीठाचा उपयोग कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. हे सांगण्याची गरज म्हणजे सरकार बदलल्यानंतर या विद्यापीठाच्या निर्मितीचा वेग मंदावला आहे. आज पुण्यात आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, शारीरिक शिक्षण तज्ज्ञ उपलब्ध आहेत. पण, त्यांना मान्यता मिळण्याची आणि त्यांनीही पुढे येण्याची गरज आहे. क्रीडा क्षेत्रात परिपूर्ण कारकीर्द घडविण्यासाठी सध्या या सगळ्या गोष्टी आता अनिवार्य झाल्या आहेत. क्रीडा संकुलाच्या निर्मितीने पुणे आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर आले. संकुलात अनेक स्पर्धा झाल्या. पण, दुर्दैवाने पुण्यात खेळाच्या मैदानांचा विकास होऊ शकला नाही. यासाठी निश्चितपणे पुण्यात स्पर्धांची संख्या वाढण्याची गरज आहे. त्यामुळे शहरातही नवी केंद्र निर्माण होतील. खो-खो खेळाने एका मागून एक नवव्या पिढी दिल्या. पण, आज पुण्यात खो-खो मैदानच काय, पण त्याची खूण असलेले पोलही दिसत नाही हे दुर्दैव आहे. कबड्डीच्या स्पर्धा घ्यायच्या झाल्या, तर मोकळी जागा शोधावी लागते, कुस्तीचे छत्रपती शिवाजी स्टेडियम निवड चाचणी स्पर्धांच्या पुढे जात नाही.

पालकांची मानसिकता

क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीच्या वाटा रुंदावल्या असल्यामुळे आता पालक वर्गही आपल्या पाल्याला क्रीडा क्षेत्र निवडण्यापासून परावृत्त करत नाही. यातूनही एक वर्ग असा आहे, की जो आपल्या पाल्यावर खेळाची निवड लादताना दिसतो. पुण्यातही अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. पण, आपल्या मुलांच्या देहयष्टीला कुठला खेळ योग्य आहे किंवा त्याला खरंच खेळात आवड आहे का, हा विचार पालकांनी करण्याची गरज आहेत. मुलगा प्रशिक्षण घ्यायला लागला की पालक वर्ग मुलाबाबत आग्रही होतात. त्याच्या प्रशिक्षण पूर्ण होण्याचीही ते वाट पाहत नाहीत. आमच्या मुलाने असेच खेळले पाहिजे, तो असाच का खेळत नाही, त्याची संघात निवड व्हायलाच हवी, तोच कसा योग्य असा हट्ट त्या खेळाडूपेक्षा पालक अधिक धरून बसतात. त्यामुळे खेळाडूची कोंडी होत आहे. पुण्यातील अनेक शाळांमध्ये असा फेरफटका मारला की हे सगळे दिसून येते किंवा कानावर पडते. खेळ कुठलाही असला, तरी तो खेळण्याची आणि त्यासाठी खेळाडूंची संख्या निश्चित आहे. त्यापेक्षा जास्त खेळाडू एकाचवेळी खेळू शकत नाहीत. हा विचार समजून घ्यायला हवा आणि आपला मुलगा खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठी पालकांनी थोडा वेळ द्यायला हवा. पालकांनी ही मानसिकता बदलायला हवी. आज पुण्यात क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक वाटा आहेत. त्याचा शोध घ्यावा किंवा त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा- Loksatta Pune Vardhapan Din 2023 : डिजिटल पुणे २०२५

हवे उत्स्फूर्त प्रोत्साहन

खेळ पुढे घेऊन जाण्यासाठी माजी खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा घेण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. नुसते प्रोत्साहन मिळाले, तरी खेळाडूची एक नवी पिढी पुण्यातून उभी राहू शकते आणि पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात ठसठशीतपणे उठून दिसेल. या प्रोत्साहनाचे एक ताजे उदाहरण देऊन थांबतो, म्हणजे एकूणच रुंदावलेल्या पुण्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे काय याची कल्पना येईल. पुण्यातील रिया कुटे या विद्या विकास शाळेतील मुलीने बॉक्सिंगमध्ये राज्य शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. या कामगिरीनंतर रिया शाळेत आली तेव्हा तिचे भव्य स्वागत करण्यात आले. तिला विजयी कमानीत चालण्याचा मान मिळाला, तिच्यावर फुले उधळण्यात आली, माजी मुख्याध्यापिकांनी ओवाळले, विद्यार्थ्यांनी तिला सलामी दिली. खरंच, एका पदक विजेत्या खेळाडूचे असे झालेले स्वागत हा भारावून टाकणारा प्रसंग होता. ज्या शाळेत शिकते, त्याच शाळेने असा गौरव करावा ही गोष्ट त्या खेळाडूसाठी निश्चितच अभिमानाचीच असणार यात शंका नाही. खेळ किंवा खेळाडूसाठी केवळ आर्थिक निधीच आवश्यक नाही, तर अशा प्रकारच्या उत्स्फूर्त प्रोत्साहनाची गरज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing opportunities around sports and athletes in pune dpj
Show comments