पुणे : गणेशोत्सवाच्या काळात देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्यवर्ती भागात येतात. त्यांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रो रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. या रात्री उशिरा सुरू असलेल्या सेवेला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी शहरासह विविध भागांतून नागरिक मध्यवर्ती भागात येतात. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मेट्रो रात्री १२ पर्यंत सुरू ठेवावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार महामेट्रोने गणेशोत्सव काळात मेट्रो सेवेचा वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा-विसर्जन सोहळ्यासाठी पुण्यातील ‘हे’ १७ रस्ते राहणार उद्या बंद
मेट्रोची सेवा २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत रात्री १२ वाजेपर्यंत सुरू आहे. तसेच, विसर्जन दिवशी रात्री २ वाजेपर्यंत सेवा सुरू असेल. मेट्रोच्या या जादा सेवेमुळे उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात येणाऱ्या नागरिकांची सोय होत आहे. मेट्रोने २२ सप्टेंबरला रात्री १० ते १२ या वेळेत २ हजार १३० प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी ही संख्या वाढून अनुक्रमे ३ हजार ५६८ आणि ७ हजार८२० वर पोहोचली. प्रवाशांची संख्या रविवारी १ लाख ३५ हजार ५०२ वर पोहोचली. ही मेट्रोची एका दिवसातील उच्चांकी प्रवासी संख्या आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.
मेट्रो प्रवासी संख्या (रात्री १० ते १२)
- २२ सप्टेंबर : २,१३०
- २३ सप्टेंबर : ३,५६८
- २४ सप्टेंबर : ७,८२०