इंदापूर : रब्बी हंगामासाठी इंदापूरच्या शेतीला खडकवासला कालव्याचे केवळ एकच आवर्तन दिले असून शेतकरी रब्बी हंगामातील पिकांच्यासाठी दुसऱ्या आवर्तनाच्या प्रतीक्षेत आहेत. खडकवासला कालव्यावर असलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आत्ताच गंभीर झाला असून उन्हाळ्यामध्ये खडकवासला कालव्यातून इंदापूरसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन देण्याबरोबर रब्बीचे दूसरे आवर्तन सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उसाची तोडणी झाल्यामुळे राखलेल्या खोडव्याला व मोकळ्या रब्बीतील पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. यामुळे रब्बीतील आवर्तन तातडीने सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे. गेल्या काही वर्षांपासून खडकवासला कालव्याच्या जीवावरील शेती व्यवसाय अडचणीत आल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. आवर्तनातील अनियमितता, कालवा व वितरिकांची दुरावस्था यामुळे शेतकऱ्यांसाठी कालव्याचे पाणी मृगजळ ठरत आहे. यातच पुण्याची वाढती पाण्याची मागणी व शेती सिंचनापेक्षा पिण्याच्या पाण्याला असलेले प्राधान्य यामुळे टेलला असलेल्या इंदापूरकरांना कालव्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत असल्याची वस्तूस्थिती आहे. परिणामी कालव्याच्या एकुण लाभक्षेत्राच्या केवळ दहा टक्के क्षेत्र सिंचित होत असल्याची वस्तूस्थिती आहे.

खडकवासला कालव्यातून ओलिताखाली आलेल्या अनेक साऱ्यांना पळसदेव परिसरात तर अद्याप पर्यंत पाणीच आले नाही शेतातून कालव्याचा फाटा गेला आहे. मात्र तिथे कॅनॉल झाल्यापासून पाणी आले नसल्यामुळे शेतकऱ्यांनी किती पिढ्या खडकवासला कालव्याच्या पाण्याची प्रतीक्षा करायची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सध्या इंदापूर तालुक्यात कालव्याच्या जीवावर शेती करायची म्हणजे जुगार खेळल्याप्रमाणे असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. कालव्याच्या पाण्याची शाश्वती राहीली नसल्याने, पिक लागवडीचा जुगार खेळायचे धाडस करण्याचे शेतकरी टाळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.

यंदा धरणात मुबलक पाणीसाठा असूनही अद्याप पाणी वितरणाचे नियोजन झालेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक अद्यापही झाली नसल्याने शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळ्यात किती आवर्तने मिळणार हे अजूनही निश्चित नाही. तर पुण्याने मंजुर पाण्यापेक्षा वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी केल्याने, इंदापूरकरांच्या तोंडाला पाण्याऐवजी पाने पुसण्याचा प्रकार होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

सध्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील विहीरींची पाणी पातळी घटली आहे. तलाव, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले आहेत. यामुळे सध्या कालव्याच्या रब्बी आवर्तनाची नितांत गरज आहे. यामुळे कालव्याचे रब्बीचे आवर्तन तातडीने सुरु करण्याबरोबर उन्हाळ्यात दोन आवर्तन देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे साकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कळस येथे शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यासाठी साकडे घातले. रब्बीतील आवर्तन सुरु करण्याबरोबर उन्हाळ्यात दोन आवर्तने देण्याची मागणी प्रतापराव पाटील ,सरपंच सविता खारतोडे, भरत भोसले ,वैशाली पाटील, विशाल भोसले, विजय गावडे, विनोद पोंदकुले , सन्मान पाटील आदी शेतकऱ्यांनी निवेदनाव्दारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.