इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील इंदापूर, करमाळा तालुक्यातील एकेकाळच्या साखरपट्ट्यात आता शेतकऱ्यांनी उसाच्या पिकाला फाटा देऊन केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे ‘उजनी’चा साखरपट्टा हा आता केळीचे आगार होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसाठी धोक्याची घंटा वाजू लागली आहे.
इंदापूरमधील पळसदेव, चांडगाव, अगोती, वरकुटे, कालठण, पडस्थळ, शिरसोडी, माळवाडी, तर करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे, टाकळी, पोमलवाडी, खातगाव, कुगाव, चिकलठाण या एकेकाळच्या साखरपट्ट्यातील शेतकरी ऊस पिकाला फाटा देऊन केळी लागवड करताना दिसत आहेत. साखरपट्ट्यात केळी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढल्याने यावर्षी अनेक सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना आपला ऊस गळीत हंगामाचा गाशा उसाअभावी लवकरच गुंडाळावा लागला असून, आगामी काळात साखर कारखान्यांना ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
उजनी धरण पाणलोट परिसरातील शेतकरी आता पारंपरिक ऊस पिकाला बगल देत, केळी लागवड करायला पसंती देत आहेत. ऊस पीक तयार होऊन गाळपास लागणारा कालावधी आणि गाळप होऊन प्रत्यक्ष हातात पैसे येण्यासाठी जास्त दिवस लागतात. तुलनेत केळी पिकाचे पैसे लवकर मिळतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. इंदापूर तालुक्यात एका साखर कारखान्याचे गाळप १३ लाख टनावरून अडीच तीन लाख टनांपर्यंत आले आहे. करमाळा तालुक्यात अनेक कारखाने बंद असल्याने तालुक्याबाहेरील खासगी किंवा सहकारी साखर कारखान्यांची मनधरणी करून ऊस गाळपासाठी आणावा लागतो.
गेल्या हंगामात केळीला प्रति किलो ३३ रुपये उच्चांकी दर मिळाला होता. सध्या केळीला २१ रुपये दर मिळत असला, तरी यापुढे दरात सुधारणा होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वप्रथम जी- नऊ जातीची केळी लागवड करण्यास पसंती देण्यात आली. त्यापासून केळी उत्पादकांना फायदा झाला. त्यानंतर धरणाच्या दोन्ही बाजूला इंदापूर व करमाळा भागात केळी पिकाचे क्षेत्र वाढले. आता हा साखरपट्टा केळीचे आगार झाला आहे. केळी पिकामध्ये कांदा, हरभरा, कलिंगड, खरबूज, मिरची यांसारखी आंतरपिके घेतली जात आहेत. धरण पाणलोट क्षेत्र आणि लाभ क्षेत्रात वर्षभरात सुमारे पंधरा लाख टन केळीचे उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी ही स्थानिक बाजारपेठेत आणि अन्य राज्यामध्ये, तर उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशात निर्यात होते. त्यातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या भागात प्रामुख्याने ग्रँडनॅन, वेलची, लाल केळी या प्रकारच्या केळीची लागवड केली जाते.
सध्या पारंपरिक पद्धतीने शेती न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येत आहे. उजनी धरण परिसरात उसापेक्षा कितीतरी पटीने केळीचे पीक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात शेतकरी केळी पिकाकडे वळाले आहेत.
धुळाभाऊ कोकरे, प्रगतशील केळी उत्पादक