इंदापूर: आमच्या पिढ्यानुपिढ्या, गाव शिवाराच्या नदीत मच्छीमारीचा व्यवसाय करून उपजीविका करीत आहेत.मासेमारीवर आमचा उदरनिर्वाह चालतो. पण या व्यवसायात वाळु प्रमाणे गुन्हेगारी बोकाळली असुन, सामान्य मच्छिमार दहशतीच्या छायेत सापडला आहे ,आम्हीं जगायचं तरी कसे? असा सवाल उपस्थित करीत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध मासेमारीस प्रोत्साहन देणाऱ्यांना वेळीच आवर घाला. असा संतप्त टाहो, आज पिढीजात व धरणग्रस्त मच्छिमारांनी भिगवण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगडे यांच्यासमोर केला. वडाप व पंड्याच्या साहाय्याने अवैध मासेमारी करून मत्स्यबीज नष्ट करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना दिले.

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भिगवण परिसरातील भोई मच्छिमारांच्या निर्माण झालेल्या समस्या जाणुन घेण्यासाठी झालेल्या बैठकीत मच्छीमारांना हे आश्वासन देण्यात आले. या बैठकीत उपस्थित मच्छिमारांनी होत असलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. व उजनीतील गोरगरीब मच्छिमारांच्या व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बस्तान बसवू पहात असल्याचे सांगितले.

अठ्ठावीस वर्षानंतर आता कुठे मच्छिमारांना चांगले दिवस आले असताना पुन्हा अवैध मासेमारी करून मत्स्यबीज व लहान मासे मारले जाऊ लागले आहेत.यातून मत्स्य संपदा व जैविक साखळी धोक्यात आली आहे . सुमारे पन्नास हुन अधिक माश्यांच्या जाती दुर्मीळ व नामशेष झाल्या होत्या.त्यामुळे स्थानिक पिढीजात व धरणग्रस्त मच्छिमारांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला होता.तर दुसऱ्या बाजुने प्रदूषणातही वाढ झाली आहे.

ही बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी २०२४ पासुन धरणात शासनामार्फत मत्स्यबीज सोडण्याचा राज्यातील पहिला धोरणात्मक निर्णय घेतला. तसेच सोडलेले मत्स्यबीज आणि इतर प्रजातींचे संवर्धन होण्यासाठी कोणत्याही आकाराच्या वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारीवर बंदी घातली आहे.याचा दृष्य परिणाम यंदा मत्स्य उत्पादन वाढीवर झाला आहे. असे असताना उजनी धरणाची पाणी पातळी कमी होऊ लागताच वडाप व पंड्याच्या साहाय्याने दैनंदिन २० ते ४० टन अवैध मासेमारी सुरू करण्यात आली आहे.यामुळे पुन्हा मत्स्यउत्पादन घटून मच्छिमार देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अवैध मासेमारीला पाठबळ देणाऱ्यांवर गुन्हा दाखल कारण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून ही अवैध मासेमारी होत आहे . असा आरोप स्थानिक मच्छीमारांचा असून अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.तसेच अवैध मासेमारीला विरोध करणाऱ्या मच्छिमारांना धमक्या देण्यात येत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे व जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता एन.एम.खाडे यांनी आता वडाप व पंड्याच्या साहाय्याने मासेमारी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याची मोहीम उघडण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या पोलीस, जलसंपदा,मत्स्यव्यवसाय विभाग,महसूल विभाग,प्रदूषण मंडळ समितीही सोबत घेऊन संयुक्त कारवाई सुरू तर करूच. मात्र ३१ एप्रिल नंतर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात येईल .असे सांगण्यात आले.

श्री.महांगडे यांनी रात्री अपरात्री देखील कारवाईस पोलीस सज्ज असतील, असे सांगितले.तसेच ज्यांच्यामुळे मच्छीमारीत समस्या निर्माण होत आहे. त्या संबंधितांना प नोटीस देणार असून, उजनीत मासेमारीवरून जर कोणता अनुचित प्रकार घडला तर त्यांना जबाबदार धरून कारवाई केली जाईल .असे स्पष्ट करण्यात आले.