इंदापूर : इंदापूर तालुक्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा कल आंतरपीकाकडे वाढू लागला असून बहुतांश ठिकाणी शेतकरी आवर्जून आंतरपीके घेत असल्याचे चित्र तालुक्याच्या विविध भागांमध्ये आढळून येत आहे. पारंपारिक पिकाला फाटा देऊन शेतकरी नगदी नफा मिळवून देणारी अनेक पिके घेऊ लागला आहे. मात्र, बाजारपेठेमध्ये शेतमालाची होणारी आवक आणि प्रत्यक्षात मिळणारे ग्राहक यावरच बहुतांशी शेतमालाचा दर ठरत असल्याने, या बेभरवशाच्या बाजारभावावर तोडगा म्हणून शेतकरी एकाच पिकात अनेक आंतरपीक घेऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतमालाचा बेभरवशाचा बाजारभाव, पीक उत्पादनासाठी सातत्याने वाढत असलेला खर्च, महागलेली रासायनिक खते,बि- बीयाणे खते कीटकनाशके तणनाशकाच्या वाढलेल्या किंमती, आणि ग्रामीण भागात शेतमजुरांचा पडलेला प्रचंड तुटवडा आदी कारणांमुळे शेतकरी आता आंतर पिकाकडे वळलेला दिसून येत आहे. इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या पिकात दुहेरी तिहेरी आंतरपीके घेऊन खर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ घालण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड दिसून येत आहे.

कोणत्या पिकाला कोणत्या वेळी कधी चांगला बाजार येईल आणि कोणत्या पिकाचा कोणत्या वेळी कधी बाजार भाव ढासळेल हे सांगता येत नसल्याने एकाच पिकात अनेक पिके घेऊन कसा तरी पिकाला होणारा खर्च काढण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. एका नाही, दुसऱ्या पिकात तरी परवडेल म्हणून फळबागेमध्ये कांदा त्यामध्येच मिरची ,कोथिंबीर ,हरभरा अशी आंतरपिके घेऊन ,कमी खर्चामध्ये अधिक कसे उत्पन्न निघेल, आणि कोणत्या ना, कोणत्या पिकाला बाजार भाव मिळेल. या आशेने आम्ही अलीकडच्या काळामध्ये आंतरपीकाकडे वळालो असे पळसदेव येतील उद्यमशील शेतकरी श्री.बाळासाहेब महादेव काळे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.