पुणे : पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जगदाळे हे लवकरच अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी दहा उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले असून, निवडणुकीच्या रिंगणात २४ उमेदवार राहिले आहेत. या उमेदवारांमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, शरद पवार गटाचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व अपक्ष उमेदवार सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने यांचे उमेदवारी अर्ज राहिले. त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागणार कधी?
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांना उमेदवारी जाहीर झाली. ‘सोनाई’ उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने, जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी बंड पुकारले. परिवर्तन मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी परिवर्तन मेळाव्यात आघाडीवर असलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा काही दिवस शांत होते. अर्ज माघारीच्या दिवशी माने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील तसेच नाराज झालेले जगदाळे यांची नाराजी दूर होऊन ते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होतील, अशी चर्चा असताना पुणे जिल्हा बँकेचे संचालक जगदाळे यांनी भरणे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यातच माने यांनी देखील उमेदवारी अर्ज कायम ठेवला. संपूर्ण माने कुटुंबीय प्रचारासाठी बाहेर पडून इंदापूर तालुका परिसर त्यांनी अक्षरशः पिंजून काढला आहे.
हेही वाचा : पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
आमदार भरणे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर जगदाळे म्हणाले, ‘मी कुणाविरोधात बोलणार नाही. पण, जर कुणी माझ्याविरोधात बोलले, तर त्यांचे सगळेच बाहेर काढीन. २०२४ पासून फार अन्याय झाला आहे. साधकबाधक चर्चेनंतर भरणे यांना पाठिंबा दिला आहे. माने यांचा निर्णय एकतर्फी आहे. तो आम्हाला मान्य नाही. आम्हाला विश्वासात न घेता माने यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.’