स्थानिक संस्था कराच्या संबंधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि व्यापारी शिष्टमंडळात बुधवारी झालेल्या चर्चेतून ठोस तोडगा न निघाल्यामुळे बेमुदत बंद कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी पुण्यात येत असून या वादाबाबत शुक्रवारी मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार असल्यामुळे पुणे, पिंपरीतील बेमुदत बंद आणखी दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, बंदमुळे पुणेकरांचे चांगलेच हाल सुरू झाले आहेत.
स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) विरोधात सुरू झालेल्या बेमुदत बंदमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाला बुधवारी मुंबईत चर्चेसाठी बोलावले होते. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, फत्तेचंद रांका, सूर्यकांत पाठक, महेंद्र पितळीया, पुणे र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष अजित सेटिया, राजू सुराणा, विजय ओसवाल, अशोक लोढा, कन्हैयालाल गुजराथी, राजेश फुलफगर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
एलबीटीमुळे होणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अडचणींची माहिती घेण्यासाठी शासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती गुरुवारी (४ एप्रिल) पुण्यात येणार असून महापालिकेत व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर समिती लगेचच त्या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करेल. या अहवालानुसार मुख्यमंत्री शुक्रवारी (५ एप्रिल) एलबीटीसंबंधी अंतिम लेखी आदेश काढतील, असे या चर्चेत सांगण्यात आले. समिती पुण्यात येणार असल्यामुळे बंद मागे घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. मात्र, एलबीटी संबंधीचे वादाचे मुद्दे जोपर्यंत सुटत नाहीत, तोपर्यंत एलबीटीला स्थगिती द्यावी, अशी मागणी करून बंद मागे घ्यायला नकार देण्यात आला.
सुप्रिया सुळे यांची चर्चा
खासदार सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील दुकाने व व्यापार बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून त्याबाबत शासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. तसेच दौऱ्यात असतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशीही त्यांनी फोनवरून चर्चा केली आणि तोडगा काढण्याबाबत त्यांना विनंती केली.
बंदमुळे पुणेकरांचे हाल, बाजारात भाव कडाडले
शहरातील बेमुदत बंदमुळे सर्वसामान्य पुणेकरांचे हाल सुरू झाले असून दूध तसेच साखर, धान्य आदी अनेक जीवनावश्यक वस्तू बाजारातून मिळवणे अवघड झाले आहे. पुण्यातील बहुतांश किराणा दुकानांमधून दूध विकले जाते. बंदमध्ये छोटी-मोठी किराणा दुकानेही सहभागी झाल्यामुळे दुधाच्या पिशव्या मिळणे कठीण झाले असून दुधाअभावी पुणेकरांचे हाल सुरू झाले आहेत. गणेश पेठेतील दूध भट्टीवरील भावही कडाडले असून बुधवारी १८ लिटरची घागर १,०५० रुपयांना विकली जात होती.
 किरकोळ दुकानदार दोन-तीन दिवस पुरेल एवढाच साठा दुकानात ठेवतात आणि साठा संपत आला की, घाऊक भुसार बाजारातून लागेल तसा माल खरेदी करतात. मात्र, गुलटेकडी मार्केट यार्ड येथील घाऊक भुसार बाजार कडकडीत बंद असल्यामुळे शहरातील जी काही दुकाने उघडी आहेत त्यांच्याकडेही माल शिल्लक नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर, धान्य, डाळी, गहू, तांदूळ वगैरेंची चांगलीच टंचाई किरकोळ बाजारात जाणवत आहे. जनावरांसाठी लागणारी पेंड, सरकी पेंड, भुस्सा यांचीही खरेदी एक-दोन दिवस पुरेल एवढीच केली जाते. मात्र, पेंड वगैरेचाही घाऊक बाजार बेमुदत बंद राहिल्यामुळे पशुखाद्याचीही टंचाई निर्माण झाली आहे.