आमदार बंधूंकडून एका शिवसेना नेत्याचा भावी आमदार म्हणून प्रचार
पिंपरी : चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची भाऊबंदकी रस्त्यावर आली आहे. आमदारांच्या तालमीत तयार झालेले त्यांचे चुलत बंधू आणि अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांनी, ऐन निवडणुकांच्या तोंडावर आमदारांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांचा भावी आमदार म्हणून उघड प्रचार सुरू केल्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
माझे दैवत म्हणून ज्या आमदारांची छायाचित्रे नवनाथ जगताप अनेक वर्षे सर्वदूर लावत आले आहेत, त्याच आमदारांच्या विरोधात नवनाथ जगताप यांनी उघड प्रचार सुरू केला आहे. त्यांनी लावलेले कलाटे यांचे शुभेच्छाफलक चर्चेचा विषय ठरले आहेत. लक्ष्मण जगताप यांचे पिंपळे गुरव, सांगवी भागात निर्विवाद वर्चस्व आहे. त्याच पट्टय़ातून नवनाथ जगताप पालिकेवर भाजपविरोधात अपक्ष निवडून आले. तेव्हापासून जगतापांमध्ये भाऊबंदकी सुरू झाली. अजूनही त्यांच्यातील बेबनाव कायम आहे. नवनाथ जगताप यांना शिक्षण मंडळाचे सदस्यपद, सभापतिपद आमदारांनीच मिळवून दिले. कमी वयात स्थायी समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लावून घेतली. बदलत्या घडामोडीत एकेकाळचा कट्टर समर्थक कडवा विरोधक बनला आहे. त्यांच्यातील वादाचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.
राहुल कलाटे एकेकाळी आमदार जगतापांचे कार्यकर्ते होते. वाकडच्या राजकारणातून त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि पुढे वाढतच गेला. सध्या त्यांच्यातून विस्तव जात नाही. नवनाथ आणि कलाटे यांच्यात आतापर्यंत अराजकीय मैत्री होती. गेल्या काही दिवसांपासून नवनाथ यांनी उघडपणे कलाटे यांचे समर्थन सुरू केले. परिवारातील गृहकलहामुळे आता नवनाथ जगताप यांनी जाहीर फलकांद्वारे कलाटे यांचा प्रचार सुरू केला आहे. या संदर्भात जगताप व कलाटे यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.