लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : मनमानी कारभार आणि नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता नसल्याचा दावा करत देहूगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नऊ नगरसेवकांनी अविश्वासाचा ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना पत्र पाठविले आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या देहू नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले आहेत. सर्व सदस्यांचा गट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पार्टी या नावाने नोंदविण्यात आलेला आहे. तर, सभागृहात भाजपचा एक सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्मिता चव्हाण यांची ११ फेब्रुवारी २०२२ रोजी नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.

आणखी वाचा-अतिउच्चदाब वीजवाहिनीत बिघाड; पिंपरी, चिंचवड, निगडी, उरूळीकांचनमध्ये दीड तास वीज खंडित

राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांनी नगराध्यक्षा चव्हाण यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला. नगराध्यक्षा चव्हाण यांनी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन कामकाज करणे अपेक्षित होते. परंतु, त्या नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेऊन कामकाज करत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या विविध योजना व सोयीसुविधा नागरिकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले नाही. परिणामी, नागरिकांमध्ये नगरपंचायतीविषयी अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही. नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवकांचा विश्वास गमावला असल्याचे जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

सर्व प्रभागातील कामे करण्यासाठी मी प्रयत्न केले. अविश्वास ठराव आणणा-या नगरसेवकांच्या प्रभागात पाणीपुरवठा, रस्त्यांची कामे केली आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन काम करते. -स्मिता चव्हाण,नगराध्यक्षा देहूगाव

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Independent party corporators passed a no confidence motion on the mayor of dehu pune print news ggy 03 mrj
Show comments