लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: भारतीय बाजारपेठेला पूरक, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सायकल तयार करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) भारत सायकल डिझाइन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित केली असून, देशभरातील तंत्रशिक्षणाच्या विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सायकल निर्मितीसाठी पारितोषिके दिली जाणार आहेत.
एआयसीटीईने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देणे, शाश्वत वाहतुकीचा प्रचार करण्यासह देशभरातील विविध वयोगटातील नागरिकांना येणाऱ्या समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी भारत सायकल डिझाइन चॅलेंज ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे एआयसीटीईने नमूद केले आहे.
विद्युत (इलेक्ट्रिक) किंवा सर्वसाधारण या दोन गटात सायकल निर्मिती करण्याचे आव्हान देण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तीन ते पाच जणांचा चमू आवश्यक आहे. त्यासाठी संकल्पना नोंदणीसाठी १३ जुलैची मुदत आहे. १ ऑगस्टला प्रारुप सादरीकरण करावे लागणार आहे. तर चाचणी आणि मूल्यमापन १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत होईल. तर २ ऑक्टोबरला अंतिम फेरीतील सायकलचे सादरीकरण होईल. सर्वोत्कृष्ट सोळा संघांना प्रारुप निर्मितीसाठी ४० हजार रुपयांचा निधी एआयसीटीईकडून दिला जाईल. तर विजेत्या संघांना एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती http://www.aicte-india.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.