पुणे : पुणेस्थित जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीने जेमकोव्हॅक ओएम ही ओमिक्रॉनवरील देशातील पहिली बूस्टर लस विकसित केली आहे. एमआरएनए आधारित ही लस असून, तिला भारतीय औषध नियंत्रण महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. कोव्हिशिल्ड अथवा कोव्हॅक्सिन ही लस घेतलेल्या व्यक्तींनी जेमकोव्हॅक ओएम ही लस घेता येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या कोविड सुरक्षा मोहिमेंतर्गत या लशीची निर्मिती करण्यात आली आहे. या लशीचा तातडीचा वापर करण्यास औषध नियंत्रकांनी परवानगीही दिली आहे. भारतात विकसित झालेली ही पहिली कोविड बूस्टर लस आहे. करोना विषाणूचा ओमिक्रॉन हा सर्वाधिक संसर्गजन्य प्रकार होता. ही लस त्यावर परिणामकारक ठरत असल्याचे वैद्यकीय चाचण्यांतून समोर आले आहे.

हेही वाचा >>>पुणे: गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या गुंडाला पकडले; पिस्तूल जप्त

जेमकोव्हॅक ओएम ही लस दोन ते आठ अंश सेल्सियस तापमानात राहू शकते. जेनोव्होने स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे या लशीची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबत जेनोवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय सिंग म्हणाले की, करोना विषाणूच्या विरोधातील बूस्टर डोसची देशाला अजूनही गरज आहे. आधी तयार करण्यात आलेल्या लशी या आता फारशा परिणामकारक ठरत नव्हत्या. त्यामुळे सध्या बाजारात प्रतिबंधात्मक डोसला पुरेशी मागणी आहे. देशातील १३ शहरांत २० केंद्रांमध्ये तीन टप्प्यात या लशीच्या चाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>‘असमान’ पाणी पुरवठा योजना! पुण्याला २४ तास पाणीपुरवठा अशक्य

दोन ते तीन आठवड्यांत बाजारात

जेमकोव्हॅक ओएम लस दोन ते तीन आठवड्यांत बाजारात येण्याची शक्यता आहे. दिल्लीत कार्यक्रम आयोजित करून ही लस सादर केली जाणार आहे. त्याचवेळी लशीची किंमत जाहीर होईल. सध्या केंद्रीय औषध प्रयोगशाळा कसौली येथे या लशीच्या १२ लाख बूस्टर डोसचा साठा ठेवण्यात आला आहे. देशांतर्गत वापरासाठी विकसित केलेल्या स्वदेशी लशींसाठी असा साठा ठेवणे बंधनकारक आहे.

हेही वाचा >>>International Yoga Day 2023 पुणे: धर्मेंद्र प्रधान, चंद्रकांत पाटील यांचा परदेशी पाहुण्यांसह ‘योग’

जेमकोव्हॅक ओएमची वैशिष्ट्ये

एमआरएनए आधारित देशातील पहिली ओमिक्रॉन बूस्टर लस
१८ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती घेऊ शकणार
कोव्हॅक्सिन, कोव्हिशिल्ड घेतलेले व्यक्तींनाही चालणार
सुई नसलेल्या ट्रॉपिस उपकरणाद्वारे दिली जाणार
ही लस २ ते ८ अंश सेल्सियसला स्थिर राहते

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India first omicron booster vaccine manufactured in pune print news stj 05 amy