इंदापूर : जगातील साखर बाजारातील बदलत्या धोरणानुसार सतर्क राहणे आवश्यक आहे. जागतिक साखर बाजारपेठेत भारताची भूमिका कायम महत्वाची राहिलेली आहे. आगामी काळातही भारत हा जागतिक बाजारपेठेत मजबूत राहण्यासाठी व्यापारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
कॉफको इंटरनॅशनल ( COFCO INTL) च्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीच्या सहकार्याने आयोजित शुगर कनेक्ट-२००२५ या परिसंवादामध्ये पुणे येथे श्री .पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, जागतिक साखर व्यापारामध्ये महाराष्ट्र राज्याची भूमिका देखील कौतुकास्पद राहिलेली आहे. सन २०२१-२२च्या हंगामात भारताने ११०लाख मे. टन साखरेची विक्रमी निर्यात केली तेव्हा ७०टक्के पेक्षा अधिकचे योगदान देऊन महाराष्ट्राने जागतिक साखर व्यापारात महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
साखर निर्यातीमधून चांगला फायदा मिळवण्यासाठी साखर कारखान्यांनी स्पर्धात्मक राहण्यासाठी उच्च गुणवत्ता राखण्यावर भर दिला पाहिजे. जागतिक बाजारातील मागणी अभ्यासपूर्णरित्या समजून घेऊन आणि त्यांची पूर्तता करून, साखर कारखाने भविष्यात निर्यातीच्या संधी वाढवू शकतात, असे मत पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले. यावेळी कॉफको इंटरनॅशनलचे साखर व्यापाराचे जागतिक प्रमुख जोस एडुआर्डो टोलेडो व मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या परिसंवादामध्ये जगातील साखर व्यापारासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. तसेच व्यापार चर्चा व प्रश्नोत्तर सत्र संपन्न झाले. कॉफकोचे भारतीय उपखंडातील साखर विभागाचे प्रमुख रवि कृष्णमूर्ती यांनी आभार मानले.