वाचनवृत्ती वाढविण्यासाठी ‘बुकवाला’ संस्थेची कल्पकता
विद्याधर कुलकर्णी, लोकसत्ता
पुणे : कंटेनर म्हटल्यावर आपल्याला आठवतो तो जहाजावर सामानाची ने-आण करण्यासाठी वापरला जाणारा आयताकृती सांगाडा किंवा ट्रकवर माल ठेवण्यासाठी असलेली बंदिस्त जागा. पण, याच कंटेनरचा वापर करून अनाथाश्रमातील मुलांसाठी ग्रंथालय साकारण्याची किमया ‘बुकवाला’ या संस्थेने साध्य केली आहे. मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासताना त्यांना वाचनासाठी वेगळ्या पद्धतीचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाची या कंटेनर ग्रंथालयाने पूर्ती केली आहे.
चाकणजवळील आळंदी कोयली येथील स्नेहवन अनाथालयातील मुलांसाठी कंटेनरमध्ये आलिशान ग्रंथालय साकारण्यात आले आहे. अमेरिकेतील बुकवाला फाउंडेशनच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीना जेकब यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन झाले. कथा सांगणाऱ्या (स्टोरीटेलर) हरिप्रिया या कार्यक्रमासाठी हैदराबाद येथून आल्या होत्या. त्यांच्यासह बुकवाला संस्थेच्या सदस्यांनी मुलांना गोष्टी वाचून दाखवल्या.भविष्यात अनेक संस्थांमध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे. स्नेहवन ज्ञानालयचे अध्यक्ष अशोक देशमाने या वेळी उपस्थित होते. महाविद्यालयीन युवक, माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे युवक हे संस्थेचे स्वयंसेवक म्हणून काम करतात, अशी माहिती बुकवाला संस्थेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष कल्याण डुबल यांनी दिली.
पुस्तकांची अजब दुनिया वाचनप्रेमी माणसाला आकर्षित करते. ज्यांना पुस्तके विकत घेणे शक्य नाही अशा अनाथाश्रमातील मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासत परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करण्याचे अनोखे काम बुकवाला संस्था गेल्या दहा वर्षांपासून करत आहे. अनाथाश्रमांमध्ये जाऊन पुस्तकांचे वाचन करणे, नव्या पुस्तकांची ओळख करून देणे असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. पुस्तकांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये संस्कार मूल्ये रूजावीत, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा आणि आपला भूतकाळ विसरून त्यांनी सर्वसाधारण मुलांप्रमाणे आयुष्य जगावे यासाठी प्रयत्न केले जातात. कंटेनरमध्ये साकारले भारतातील पहिले ग्रंथालय आहे, असे त्यांनी सांगितले.
बुकवाला ग्रंथालयामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेतील गोष्टींची पुस्तके, कथा, कादंबऱ्या, सुपरहिरो , परीकथा अशी वेगवेगळी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. मुलांच्या बौद्धिक क्षमतेनुसार पुस्तके वाचावयास दिली जातात. संस्थांमधील मुले ही या ग्रंथालयातील पुस्तके आठवडाभर वाचू शकतात. बुकवाला संस्थेचे स्वयंसेवक आठवडय़ातून एकदा संबंधित संस्थेला भेट देतात आणि तेथील मुलांसमोर एका पुस्तकाचे अभिवाचन करतात. वाचलेल्या पुस्तकांबद्दल मुलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतात. ज्यांचे वाचन झाले आहे अशी पुस्तके बुकवाला संस्थेच्या ग्रंथालयाला भेट दिली जातात. संस्थेने आतापर्यंत एस. ओ. एस. बालग्राम (येरवडा), मानव्य गोकुळ अनाथाश्रम (भूगाव), सन्मती बाल निकेतन (मांजरी) आणि भारतीय जैन संघटना (वाघोली) येथे ग्रंथालय सुरू केले आहे, असे कल्याण डुबल यांनी सांगितले.