पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊसाचे उत्पादन वाढवण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, आता हा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबवला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी या बाबतची माहिती दिली. विश्वस्त प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे या वेळी उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात घेण्यात आली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती भ‌विष्यात शक्य करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेतीचा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करून सातत्याने मार्गदर्शन करण्यात आले. ऊसापासून सुरू झालेला हा प्रयोग इतर पिकांपर्यंत विस्तारण्यात येईल. राज्यभरातील शेतकऱ्यांना यात सहभागी करत त्यांचे अर्थकारण बदलण्याचा हा प्रयत्न आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘त्या’ विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्तीचा लाभ… काय आहे योजना?

प्रकल्पाचे महत्त्व

प्रकल्पात उपग्रह तंत्रज्ञान, प्लॉट मॅपिंग, स्वयंचलित हवामान केंद्र, आयओटी सेन्सर प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने खत आणि पाणी व्यवस्थापन करता येते. जमिनीची सुपिकता, पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो. कुठले पीक कधी घ्यायचे आणि पिकांच्या निरीक्षणाद्वारे अद्ययावत माहिती शेतकऱ्याला मिळते. हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखन कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. संवेदक तंत्रज्ञानामुळे मातीमधील सर्व अन्नद्रव्याचे प्रमाण अवघ्या १० ते १५ मिनिटात कळते, हवामानातील तापमान, आर्द्रता, पानांचा ओलावा, सूर्यप्रकाशाची तीव्रता याची माहिती मिळते. ड्रोन तंत्रज्ञानामुळे पिकाचे आरोग्य, कीड व रोग ओळखणे, अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करता येते. कमी वेळेत जास्त क्षेत्रात फवारणी करणे शक्य होते, त्यासाठी प्रती एकर ५०० ते ७०० रुपये खर्च येतो. त्यामुळे उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होऊन उत्पन्न २२ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले.

Story img Loader