पुणे : आगामी वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात असताना भारतातून तृणधान्यांच्या निर्यातीचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गत आर्थिक वर्षांत (२०२१-२२) देशातील तृणधान्य निर्यात साडेसहा कोटी डॉलर इतकी नोंदवण्यात आली. जागतिक तृणधान्य बाजाराची उलाढाल जेमतेम ५० कोटी डॉलर इतकी असताना भारताचा त्यातील वाटा १० टक्क्यांवर पोहोचला आहे.
शेती आणि प्रक्रियायुक्त अन्न पदार्थ निर्यात विकास संस्थेने (अपेडा) दिलेल्या माहितीनुसार, जगातील प्रमुख पाच देशांमधून तृणधान्यांची निर्यात होते. त्यात युक्रेन, भारतासह आफ्रिकेतील देशांचा समावेश आहे. तृणधान्य आणि खाद्यपदार्थाची जागतिक बाजारपेठ २०२०मध्ये ४० कोटी डॉलरवर होती, ती २०२१ मध्ये ४७ कोटी डॉलरवर गेली. भारताचा विचार करता २०२०-२१ मध्ये देशातून सहा कोटी डॉलरच्या तृणधान्यांची आणि तृणधान्यांपासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाची निर्यात झाली होती. २०२१-२२ मध्ये ही उलाढाल साडेसहा कोटी डॉलरच्या घरात गेली आहे.
भारताच्या पुढाकाराने २०२३ वर्ष संयुक्त राष्ट्राच्या वतीने जागतिक तृणधान्य वर्ष साजरे केले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देशात आणि देशाबाहेर तृणधान्यांच्या बाबत जागृती केली जात आहे. त्यामुळे जगभरात तृणधान्यांच्या उत्पादनात वाढ होऊन, तृणधान्यांचा दैनंदिन आहारात वापर वाढेल, असे सांगण्यात येत आहे. जागतिक अन्न संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, आशिया आणि आफ्रिका खंडात तृणधान्यांचा खाण्यात वापर केला जातो. जगातील सुमारे १.२ अब्ज लोकसंख्या तृणधान्यांचा दैनदिन आहारात वापर करते. २०२० मध्ये तृणधान्यांचे एकूण जागतिक उत्पादन सुमारे २ लाख ८० हजार टन इतके होते. भारतानंतर आफ्रिका खंडात तृणधान्यांचे सर्वाधिक उत्पादन होते. त्या खालोखाल चीन, युक्रेनचा क्रमांक लागतो.
भारतात तृणधान्यांचे उत्पादन कुठे?
राज्यस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांत तृणधान्यांचे उत्पादन होते. मुळात कमी पावसात आणि डोंगर-दऱ्यांमध्ये तृणधान्यांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे तृणधान्यांच्या क्षेत्र आणि उत्पादन वाढीला मर्यादा आहेत.
मुळात जगभरात फारच कमी देशात तृणधान्यांचे उत्पादन होते. भारतात उत्पादन चांगले होत असले तरीही आहारात वापरही जास्त होतो. त्यामुळे आपली गरज भागून फार काही निर्यात करता येत नाही. तरीही निर्यातीत होत असलेली वाढ उत्साह वाढविणारी आहे.
– महेश लोंढे, तृणधान्य आधारित खाद्यपदार्थ उद्योजक