पुणे :  देशातून सागरी खाद्याची आजवरची सर्वाधिक निर्यात झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३मध्ये ६३,९६९.१४ कोटी रुपये किमतीच्या १७,३५,२८६ टन सागरी खाद्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत निर्यातीत २६.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निर्यातीत कोळंबीचा सर्वाधिक वाटा असून, अमेरिका आणि चीन कोळंबीचे मोठे आयातदार ठरले आहेत. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने ६३,९६९.१४ कोटी रुपये किमतीच्या (८.०९ अब्ज डॉलर) १७,३५,२८६ टन सागरी खाद्य उत्पादनांची केली निर्यात केली आहे. ही आजवरची उच्चांकी निर्यात ठरली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत निर्यातीत २६.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांत भारताने ५७,५८६.४८ कोटी रुपये किमतीच्या १३,६९,२६४ टन सागरी खाद्य उत्पादनांची निर्यात केली होती.

एकूण सागरी उत्पादनांच्या निर्यातीत  कोळंबी आघाडीवर आहे. कोळंबीची अमेरिका आणि चीनला सर्वाधिक निर्यात झाली आहे.

 एकूण ४३,१३५.५८ कोटी रुपये किमतीच्या कोळंबीची निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीत वजनाच्या बाबत फक्त कोळंबीचा वाटा ४०.९८ टक्के, तर एकूण निर्यात मूल्यात कोळंबीचा वाटा ६७.७२ टक्के इतका आहे.

गोठवलेले मासे निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एकूण ५५०३.१८ कोटी रुपये मूल्याच्या गोठवलेल्या माशांची निर्यात झाली आहे. एकूण निर्यातीतील वाटा २१.२४ टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर सुरमई आहे. २०१३.६६ कोटी रुपये किमतीच्या सुरमईची निर्यात झाली आहे.

सर्वाधिक निर्यात अमेरिकेत

भारताच्या २०२२-२३च्या एकूण निर्यातीपैकी सर्वाधिक निर्यात अमेरिकेला झाली आहे. वजनाच्या बाबत विचार करता एकूण निर्यातीपैकी अमेरिकेला १२.६३ टक्के निर्यात झाली आहे. त्यापोटी देशाला २६३२०.८ लाख डॉलरची गंगाजळी मिळाली आहे. चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनला ४,०५,५४७ टन निर्यात झाली आहे. युरोपीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. युरोपीय संघाला २,०७,९७६ टन सागरी खाद्याची निर्यात झाली आहे. त्यानंतर आग्नेय आशियाचा नंबर लागतो.

सागरी खाद्याच्या निर्यातीत भारत आघाडीवरील देश आहे. कठोर अटी, नियमांमुळे अमेरिका आणि युरोपला निर्यात करणे अवघड असते. पण, निर्यातदारांनी मार्गदर्शक सूचनांची योग्य अंमलबजावणी केल्यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे.

– डॉ. विवेक वर्तक, मत्स्य शास्त्रज्ञ, खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tops prawn exporters to us and china india s seafood exports touch all time high in 2022 23 zws