पुणे : भारतामध्ये आपण स्वदेशी बनावटीची किफायतशीर वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि उपचार पद्धती विकसित करून ती जगाला देऊ शकतो. मधुमेह चिकित्सेमध्ये जगाला मार्ग दाखवण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे, असा दावा मद्रास डायबेटिस रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. व्ही. मोहन यांनी केले.
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटच्या वतीने पुण्यात नवव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटचे डॉ.सी.व्ही.संजीवी, यूके नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे (एनआयएचआर) चे संचालक डॉ.कमलेश खुंटी, चेलाराम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.प्रकाश भूपटकर, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी.आणि मुख्य वैद्यकीय अधिक्षक विंग कमांडर (निवृत्त) डॉ. हर्षल मोरे आणि वैद्यकीय सेवा विभागाच्या प्रमुख डॉ.वेदवती पुरंदरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. व्ही. मोहन यांना मधुमेह क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना डॉ. व्ही. मोहन म्हणाले की, सध्याचा काळ हा भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारतातील औषध निर्माण क्षेत्र हे गुणवत्तेच्या बाबतीत जगात आघाडीवर आहे. आपल्या गरजांप्रमाणे आपण स्वदेशी बनावटीची किफायतशीर वैद्यकीय उपकरणे आणि उपचार पद्धती विकसित करू शकतो. मधुमेह चिकित्सेमध्ये जगाला मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य भारतीय वैद्यकीय क्षेत्रात आहे.
डॉ.सी.व्ही.संजीवी म्हणाले की, भारतात मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याशिवाय मधुमेहाच्या पूर्व टप्प्यातील संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे हे कमी करण्यासाठी जोखमीच्या घटकांचा विचार करून संपूर्ण आरोग्य या संकल्पनेवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवे. आपल्याकडे एवढा मोठा माहितीसाठा असताना आपण आपल्या देशातील मधुमेह चिकित्सेचे वेगळे प्रारूप विकसित करू शकतो.
मधुमेहाच्या उपायांवर विचारमंथन
मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहाच्या धोक्याचा व गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनातील तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा करण्यात आली. या परिषदेमध्ये मधुमेहाचा सामना करण्यासाठी गरोदरपणातील मधुमेह आणि प्रॅक्टिकल इन्शुलिन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आल्या.