पुणे : पुण्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले. एकतानगर भागात बचावकार्य करण्यासाठी दाखल झालेल्या लष्कराच्या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
पुणे शहर आणि परिसराला बुधवारपासून झोडपले आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे एकतानगरसारख्या भागांमध्ये पाणी भरले. या भागात जवळपास छातीभर पाणी आहे. अनेक दुकाने, घरांमध्ये पाणी शिरले. त्याशिवाय नदीकाठच्या काही भागांनाही फटका बसून पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मदतकार्यासाठी प्रशासनाने लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला विनंती केली. त्यानुसार आता लष्कराचे पथक मदतकार्यासाठी दाखल झाले आहे.
हेही वाचा…पुणे : जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अधिकारी, नागरी प्रशासन. इतर सरकारी संस्थांशी समन्वय साधत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. लष्कराच्या कृती दलामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट, वैद्यकीय पथके सहभागी आहेत. लष्कराचे जवान बचाव आणि मदत कार्यात संपूर्णपणे सहभागी झाले आहेत. तसेच मदतीसाठी भारतीय हवाई दलाला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आले असून, आवश्यकतेनुसार कमी वेळेत घटनास्थळी पोहोचतील.