चिन्मय पाटणकर
भारतातील कर्करोगाच्या र्सवकष अभ्यासासाठी इंडियन कॅन्सर जिनोम अॅटलास (आयसीजीए) हा महाप्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कर्करोगाच्या संशोधनासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प राबवण्यात येत असून, स्तनाच्या कर्करोगाच्या अभ्यासापासून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
देशात शहरी भागासह ग्रामीण भागात स्तनाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाचे रुग्ण भारतात आढळतात. कर्करोगाचे साधारणपणे १० ते १३ लाख रुग्ण दरवर्षी आढळतात. त्यामुळे केवळ कर्करोगाचा र्सवकष अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी इंडियन कॅन्सर जिनोम अॅटलास हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी जैवतंत्रज्ञान विभागाने विविध आजारांच्या अभ्यासासाठी सुरू केलेल्या या महाप्रकल्पाच्या धर्तीवरच इंडियन कॅन्सर जिनोम हा प्रकल्प राबवला जाणार आहे.
प्रकल्पातील शास्त्रज्ञ डॉ. संतोष दीक्षित यांनी या प्रकल्पाची ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. या प्रकल्पासाठी आयसीजीए फाउंडेशनची स्थापना जानेवारीमध्ये करण्यात आली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात स्तनाच्या कर्करोगाचा जनुकीय अभ्यास केला जाईल. त्यातून भारतातील स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील माहिती पुढील दोन ते तीन वर्षांत संकलित होईल. ही माहिती कर्करोगाचे लवकर निदान, उपचार पद्धती, व्यक्तिगत पातळीवरील उपचारासाठी उपयुक्त ठरेल, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले. अमेरिका, जपान या देशांमध्ये असा प्रकल्प यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता भारतातही हा प्रकल्प राबवला जाणार आहे. स्तनाच्या कर्करोगापासून सुरुवात करून कर्करोगाच्या सर्व प्रकारांचा अभ्यास या प्रकल्पात केला जाणार असल्याचे डॉ. दीक्षित यांनी स्पष्ट केले.
जागतिक कर्करोग दिन विशेष
देशातील, परदेशातील संस्थांचा सहभाग
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) पुढाकाराने राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, भारतीय वैद्यक संशोधन परिषद (आयसीएमआर), पुण्यातील प्रशांती कॅन्सर केअर मिशन, आयसर पुणे, पर्सिस्टंट सिस्टिम्स, कोलकात्याचे सरोज गुप्ता कॅन्सर सेंटर, आयआयटी हैद्राबाद यांचा सहभाग आहे. तसेच अमेरिकेतील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट, इंडियाना युनिव्हर्सिटी, लंडनमधील इन्स्टिटय़ूट ऑफ कॅन्सर यांचेही प्रकल्पासाठी सहकार्य मिळत आहे. पुढील टप्प्यात आणखी संस्था जोडल्या जातील, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.
वैद्यकीय तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, खासगी कंपन्या, प्रयोगशाळा असे विविध घटक एकत्र येऊन इंडियन कॅन्सर जिनोम अॅटलास हा प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पात कर्करोगाच्या रुग्णांच्या नमुन्यांचा जनुकीय अभ्यास केला जाईल. त्याद्वारे कर्करोगाच्या विषाणूतील बदल, परदेशातील आणि भारतातील कर्करोगातील फरक असा विविध प्रकारचा अभ्यास केला जाईल. तसेच कर्करोगाचे लवकर निदान होण्यासाठी काय करता येईल याचाही अभ्यास करता येईल. देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
– डॉ. शेखर मांडे, महासंचालक, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)
भारतातील कॅन्सरचे उपचार आणि परदेशातील कॅन्सरच्या उपचारांमध्ये फरक आहे. त्यामुळे भारतातील कॅन्सरची जनुकीय रचना अभ्यासल्यास भारतातील कॅ न्सरवर प्रभावी उपचार पद्धती निश्चित करता येईल. त्यासाठी ‘इंडियन कॅन्सर जिनोम अॅटलास’ हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल. या प्रकल्पात शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ एकत्र येऊन काम करत आहेत.
– डॉ. सी. बी. कोप्पीकर, ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ