डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय राज्यघटना आता सुलभ मराठीमध्ये आणि तीही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ‘ओवी’ या काव्यवृत्तामध्ये अवतरली आहे. सर्वाना सोप्या भाषेत समजावी या उद्देशातून सौरभ देशपांडे या युवा कायद्याच्या अभ्यासकाने तीन वर्षे मेहनत करून परिश्रमपूर्वक भारतीय राज्यघटनेचे ओवीबद्ध  रूपांतर केले आहे. प्रादेशिक भाषेमध्ये अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अॅड. सौरभ देशपांडे यांनी २६ जानेवारी २०१२ रोजी राज्यघटनेच्या ओवीबद्ध रूपांतरणाला प्रारंभ केला. तीन वर्षांनी २६ जानेवारीलाच तीन हजार ओव्यांमध्ये हे रूपांतरण सिद्ध केले आहे. काही ओव्या झाल्यानंतर राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. विजय देव यांना ते दाखविले. त्यांनी हे रूपांतर योग्य असल्याचे सांगितल्यानंतर हे काम नेटाने पूर्ण केल्याचे सौरभ देशपांडे यांनी सांगितले. २६ नोव्हेंबर हा देशभर संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. हे औचित्य साधून सौरभ देशपांडे यांनी ओवीबद्ध रूपांतरणाचे हस्तलिखित सोमवारी दाखविले. ओवीबद्ध राज्यघटना लवकरच पुस्तकरूपामध्ये आणण्याचाही मानस असल्याचे त्यांनी सांगितले. हे रूपांतर करताना घटनेतील कलमांच्या आशयाला किंचितही बाधा येणार नाही याचे भान राखले आहे. घटनेचा सरनामा, मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य, केंद्र-राज्य संबंध, राष्ट्रपतींची निवड, ही घटनेतील मांडणी तसेच अनुषंगिक परिशिष्टे याचा परामर्श घेत घटनेच्या ३९५ कलमांचे सुलभ मराठी ओवीरूप केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताची लिखित राज्यघटना ही आदर्शवत मानली जाते. मात्र, मोठा विस्तार आणि कायदेशीर परिभाषा यामुळे ती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. हे वास्तव ध्यानात घेऊन ज्येष्ठ संसदपटू बॅ. नाथ पै यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत सर्वसामान्यांना उमजेल अशी एखादी ‘ग्यानबाची राज्यघटना’ उपलब्ध झाली पाहिजे, अशी इच्छा प्रदर्शित केली होती. या विचारांतून प्रेरणा घेऊन मी हे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले, असे देशपांडे यांनी सांगितले. घटनेचा विशेष अभ्यास केलेल्या देशपांडे यांनी ‘अमात्यांचे आज्ञापत्र आणि भारतीय संविधान’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. विधी शाखेच्या पदव्युत्तर परीक्षेसाठी त्यांनी ‘भारतीय राज्यघटनेत झालेल्या दुरुस्त्यांचा अभ्यास’ हा विषय घेऊन प्रबंध लिहिला होता. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या प्रेरणेतून निर्मित ‘आपले संविधान, आपला आत्मविश्वास’ या मालिकेसाठी लेखन केले आहे.
ओव्यांचा नमुना
भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक
आम्ही नागरिक भारताचे! बनवितो संविधान आमुचे!
घेऊनिया अधिष्ठान तत्त्वांचे! पुढीलप्रमाणे !!१!!
सार्वभौम प्रजासत्ताक! समाजवादी अन् धर्मनिरपेक्ष!
लोकशाही गणराज्य! असेल आमुचे हे !!२!!
सामाजिक आणि आर्थिक! आणि तैसेचि राजकीय!
ऐसा असेल सकळांस! न्याय येथे !!३!!
विश्वास, श्रद्धा व पूजेचे! विचार अन् अभिव्यक्तीचे!
ऐसे असेल साचे! स्वातंत्र्य सकळा !!४!!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा