पुणे : कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे. डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत.
डॉ. कनुरू यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कर्करोगतज्ज्ञ डॉ. श्रीराम इनामदार या वेळी उपस्थित होते. या औषधाची परिणामकारकता वैद्यकीय संशोधनातून (क्लिनिकल ट्रायल) स्पष्ट झाली असून, ‘जर्नल ऑफ ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल पॅथोलॉजी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने त्याची दखल घेतली आहे. या संशोधनामुळे प्राथमिक अवस्थेतील तोंडाच्या कर्करोगावर तीव्र औषधांच्या वापराशिवाय उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे, भविष्यात केमोथेरपी आणि रेडिएशनसारख्या उपचारांवरील अवलंबित्वही कमी होणार आहे.
डॉ. विजय कनुरू म्हणाले, देशात तोंडाच्या कर्करोगामुळे प्रत्येक तासाला पाचपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. नॅनो कर्क्युमिनच्या वापरातून आम्ही ‘ब्रेकॅन’ हे औषध विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यातील आणि तोंडाच्या कर्करोगावरील शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठीही हे औषध परिणामकारक असल्याचे वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. या प्रकारातील कर्करोगामध्ये रुग्णाला तोंड उघडणे कठीण होते. त्यामुळे तोंडाची स्वच्छताही अवघड होते. त्यातून इतर संसर्ग होण्याची शक्यता बळावते.
हेही वाचा – वसंत मोरे म्हणतात… मला नीट मांडी घालूनही बसता येते!
तोंडाचा कर्करोग प्राथमिक टप्प्यात असलेल्या ३० रुग्णांच्या समुहावर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून पहिल्या आठवड्यापासून सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे डॉ. कनुरू यांनी स्पष्ट केले. मुखाच्या कर्करोगावर प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दैनंदिन वापराचा स्प्रे, तसेच फुप्फुसाचा कर्करोग आणि स्तनांचा कर्करोग यांवरील उपचारांबाबत संशोधन सुरू असल्याचे डॉ. कनुरू म्हणाले.