डॉ. सी. व्ही. रामन यांच्यानंतर संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळालेल्या सर्व संशोधकांना परदेशी विद्यापीठांमधून संशोधन करावे लागले होते, ही बाब लक्षात घ्यायला हवी. भारतीय विद्यापीठांनी संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करायला हवे. शिक्षण, संशोधन यांकडे पाहण्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन निर्माण होणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी केले.
भारती विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवाची सांगता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाली. या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ. विश्वजित कदम आदी  उपस्थित होते. या वेळी विद्यापीठाची वाटचाल दाखवणाऱ्या संग्रहालयाचे आणि ईर्षां या संशोधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मुखर्जी म्हणाले, ‘भारतीय शिक्षणव्यवस्थेची संख्यात्मक वाढ खूप मोठी आहे. आपल्याकडे क्षमता आहेत, ज्ञान आहे. येत्या काळात सर्व जगाला आपण कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवू शकू. मात्र, भारतीय विद्यापीठांचा दर्जा वाढणे गरजेचे आहे. आपल्या विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी पोषक वातावरणाचा अभाव आहे. शिक्षण, संशोधन आणि सामाजिक बांधिलकी अशा सर्वसमावेशक दृष्टिकोनातून शिक्षण व्यवस्थेकडे पाहिले जावे. एके काळी भारत उच्च शिक्षणांत जगावर राज्य करत होता. नालंदा, तक्षशीला, वलभी, सोमपुरा या विद्यापीठांनी उच्च शिक्षणात आपला ठसा उमटवला. मात्र, सध्या जगातील दोनशे विद्यापीठांमध्ये एकही भारतीय विद्यापीठ नसावे, ही खेदाची बाब आहे. याबाबत मी वारंवार बोललो आहे. शिक्षण व्यवस्था आणि उद्योग यांच्यातील सहकार्यही वाढले पाहिजे. उद्योगांनीही शिक्षणक्षेत्रात गुंतवणूक केली पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. जागतिकीकरण हा न टाळता येणारा भाग आहे, हे शिक्षण क्षेत्राच्या बाबतीतही लक्षात घ्यायला हवे.’