‘‘७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, एका वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिला हे वगळता इतर कोणालाही विमानाची सेवा देणार नाही. इतरांनी आपली आपली व्यवस्था पाहावी.. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दुपारी असे जाहीर केले आणि आता आमच्यापुढे काहीही पर्याय उरला नाही.’’
..काठमांडूच्या विमानतळावर गेले चार दिवस अडकून पडलेले ६५ वर्षांचे सुरेश पाटील सांगत होते. सोबत आहेत, पाच महिला (त्यापैकी दोघी ६५/६६ वर्षांच्या), चार मुले (त्यापैकी एक अडीच, तर एक चार वर्षांचा). त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. ‘जायचे तर बसने जा, असे सांगून अधिकारी मोकळे झाले, पण विमानतळ सोडला की इतक्या गदारोळात कोण दाद लागू देणार?’ असा सवालही पाटील यांनी केला.
पाटील कुटुंबीय आणि नातेवाईक ( पुणे, इस्लामपूर, सांगली) मिळून एकूण अकरा जण गेल्या २४ तारखेला नेपाळला गेले. ते तिथे पोहोचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (गेल्या शनिवारी) भूकंप झाला. त्यामुळे शनिवारी ते लगेचच विमानतळावर पोहोचले. मात्र, त्या दिवसापासून अजूनही ते तेथेच अडकलेले आहेत. चार दिवस उलटत आल्यामुळे आता अधीरता प्रचंड वाढली आहे. रांगेत उभे राहून दोनदा क्रमांकही आला, पण काहीतरी कारण सांगून त्यांना संधी नाकारण्यात आली. खाणे, पिण्याचे पाणी याची गैरव्यवस्था आहे. महिलांचे आणि मुलांचे प्रश्न आहेत. त्यामुळे कधी जायला मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. अशी स्थिती असताना आता त्यांचे लगेच येण्याचे मार्ग बंद झाल्यात जमा आहेत. पाटील यांनी सांगितले, की मंगळवारी दुपारी भारतीय दूतावासातील दोनतीन अधिकारी आले. त्यांच्यापैकी एकाने जाहीर केले, की ७५ वर्षांपुढचे वयस्कर, एका वर्षांखालील वयाची मुले आणि गर्भवती महिला वगळता इतर कोणाला विमानाची सेवा मिळणार नाही. ज्यांना जायचे असेल त्यांनी बसने जावे. यामुळे आता आणखी किती दिवस राहावे लागणार, हे प्रश्न उभे आहे.
‘आमच्याकडून व्यवस्था होणार नाही, तुमचं तुम्ही पाहा!’
‘‘७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे वृद्ध, एका वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गर्भवती महिला हे वगळता इतरांनी आपली आपली व्यवस्था पाहावी.. भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी दुपारी असे जाहीर केले.
First published on: 29-04-2015 at 03:22 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian embassy useless for indian tourists