नरेंद्र मोदी ज्याचा जगभर प्रचार करतात त्या ‘गांधी-बुद्ध मॉडेल’कडे देशातील दलित समाज संशयाने पाहतो, असे मत एकोणनव्वदाव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. हैद्राबाद केंद्रीय विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने ते बोलत होते.
‘इंडियन एक्स्प्रेस’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्सचेंज’ या कार्यक्रमात बुधवारी सबनीस यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी सबनीस म्हणाले, ‘हैद्राबादमध्ये दलित तरुणाला आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले आणि या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यांचे नाव चौकशीच्या फेऱ्यात आहे. मोदी जगभर प्रचार करत असलेल्या ‘बुद्ध मॉडेल’कडे देशातील दलित समाज संशयाने पाहत असल्याचे यावरून स्पष्ट होते.’
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदी मुस्लीम समाजाचे रक्षण करण्यात आणि त्यांचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरले, असे सबनीस यांनी सांगितले. परंतु गुजरात दंगलींमागे मोदी आहेत असे आपल्याला म्हणायचे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेल्या मोदींशी मी सहमत नाही. ते मुस्लीम समाजातील लोकांचा जीव वाचवण्यात अपयशी ठरले. त्यांना सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’ मिळाली, पण तो डाग राहिलाच. त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले.’
मी आज जे बोलतो आहे ते भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी याआधी म्हटले होते, असे सांगून सबनीस म्हणाले, ‘गोध्रा दंगलींच्या पाश्र्वभूमीवर ‘राज धर्म पाळला गेला नाही,’ असे वाजपेयी यांनी स्पष्टपणे म्हटले होते.’ पंतप्रधान म्हणून मात्र आपण मोदींच्या बाजूने आहोत, मोदींमध्ये परिवर्तन झाले असून त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे, तसेच शांती व देशाच्या सुरक्षिततेसाठी त्यांचे प्रयत्न आहेत, असे सबनीस यांनी सांगितले.
मोदींच्या ‘गांधी-बुद्ध मॉडेल’कडे दलित समाज संशयाने पाहतो – श्रीपाल सबनीस
नरेंद्र मोदी जगभर प्रचार करतात त्या ‘गांधी-बुद्ध मॉडेल’कडे देशातील दलित समाज संशयाने पाहतो, असे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 21-01-2016 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian express idea exchange