पुणे : जागतिक मंदीसदृश स्थिती आणि अन्य काही कारणांमुळे देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीतील (आयआयटी) अनेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळण्याचा प्रकार ताजा आहे. त्यातच आता विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्ये कमालीची घट झाल्याचे समोर आले असून, काहींना तर वार्षिक १० लाख रुपयांपेक्षा कमी पॅकेज मिळाले आहे. त्यामुळे आयआयटीत शिकून गलेलठ्ठ वेतनाच्या चर्चाचा फुगा आता फुटल्याचे चित्र आहे.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, डिझाइन अभ्यासक्रमांसाठी आयआयटीची जगभर ख्याती आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेतन पॅकेजचा मुद्दा समोर आला असून विद्यार्थ्यांना मिळालेल्या पॅकेजची रक्कम घटली आहे. दरवर्षी कोटयवधी रुपयांच्या पॅकेजची चर्चा होत असताना यंदा प्लेसमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना अक्षरश: १०-१२ लाख रुपयांच्या पॅकेजवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे प्लेसमेंटची ऑफर, पॅकेज हातात असूनही विद्यार्थी अधिक चांगली नोकरी, पॅकेजच्या शोधात आहेत.
हेही वाचा >>> राज्य, केंद्रीय, खासगी विद्यापीठांची एआयसीटीईच्या मान्यतेपासून सुटका… झाले काय?
आयआयटीच्या विद्यार्थ्यांना यंदा कमी वेतनाच्या ऑफर्सबाबत माजी विद्यार्थी आणि ‘ग्लोबल आयआयटी अल्युम्नी सपोर्ट ग्रुप’चे प्रमुख धीरज सिंग म्हणाले, की आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पॅकेजमध्ये २०२२-२३मध्ये १० टक्के घट झाली होती. त्यानंतर २०२३-२४मध्ये पॅकेजमध्ये ३० ते ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सरासरी २० लाख रुपये असणारे पॅकेज आता १० ते १२ लाख रुपयांवर आले आहे. ही घट लक्षणीय आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळणे आणि काही विद्यार्थ्यांना कमी पॅकेजची नोकरी असा कटू अनुभव घ्यावा लागत आहे.
हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती..
* आयआयटीतील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट न मिळणे, पॅकेजमध्ये घट होणे हे यंदाच घडते आहे असे नाही. तर गेली काही वर्षे हे होत आहे. मात्र यंदा ते अधोरेखित झाले आहे.
* प्लेसमेंट न मिळणे, कमी पॅकेज मिळणे याचा विद्यार्थ्यांच्या मनावर, त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होतो ही विचार करण्याजोगी बाब आहे. ही परिस्थिती कायम राहील का, याची अनेक विद्यार्थ्यांना भीती वाटते. * प्लेसमेंट न मिळणे, पॅकेज कमी मिळणे हा प्रश्न अद्याप योग्य पद्धतीने हाताळला गेलेला नाही, असेही धीरज सिंग यांनी सांगितले.