पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई) गुणही ग्राह्य धरले जात होते. मात्र, यंदा आयसरचे प्रवेश केवळ आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट (आयएटी) या प्रवेश परीक्षेद्वारे होणार असून, जेईईचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयसर ही शिक्षण संस्था केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील आहे. पुण्यासह तिरुपती, भोपाळ, मोहाली, तिरुअनंतपुरम, कोलकाता, बेहरामपूर या सात ठिकाणी आयसरची शैक्षणिक संकुले आहेत. विज्ञान आणि मानव्यविज्ञानातील पदवी, पदव्युत्तर, संशोधनातील चार वर्षांचा पदवी (बीएस) अभ्यासक्रम, पाच वर्षांचा पदव्युत्तर पदवी (बीएस-एमएस) हे अभ्यासक्रम येथे राबवले जातात. गेल्या काही वर्षांत आयसरने विज्ञान, संशोधनाच्या क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आयसरच्या प्रवेशासाठीही मोठी चुरस पाहायला मिळते.

हेही वाचा : शाळेत न जाता पुण्याच्या सई पाटीलने सोडवले ऑलिम्पियाडचे ‘गणित’

आयसर कोलकाताच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद नातू म्हणाले, की आतापर्यंत जेईईचे गुण आयसरच्या प्रवेशासाठी ग्राह्य धरले जात होते. मात्र, यंदा जेईईचे वेळापत्रक जुळत नसल्याने आयसरचे प्रवेश केवळ आयसर ॲप्टिट्यूड टेस्टद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे.

हेही वाचा : पुणेकरांचा हवाई प्रवास ठरतोय ‘वाऱ्यावरची वरात’!

आयआयएससीच्या प्रवेशप्रक्रियेत बदल

बंगळुरूच्या प्रतिष्ठित भारतीय विज्ञान संस्थेचे (आयआयएससी) प्रवेशही ‘आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट’द्वारेच होणार आहेत. आयआयएससीच्या प्रवेशांसाठी किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेतील (केव्हीपीवाय) गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली जात होती. मात्र आता ही परीक्षा केंद्र सरकारने बंद केल्यामुळे आयआयएससीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करून आयसरच्या प्रवेश परीक्षेतून करण्याचा निर्णय झाल्याची माहिती डॉ. नातू यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian institutes of science education and research admission process changed know exam pattern pune print news ccp 14 css
Show comments