भारतीय भाषांतील स्त्रीवाद नेमका कसा आहे याचे विवेचन करीत या लेखनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा ‘भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्य’ हा ग्रंथ लवकरच वाचक आणि अभ्यासकांसाठी उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी संपादित केलेल्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ (खंड सातवा) या प्रकल्पानंतर महाराष्ट्र साहित्य परिषद आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिद्धीस नेत आहे.
स्त्रीवादाच्या ज्येष्ठ अभ्यासिका आणि कवयित्री डॉ. अश्विनी धोंगडे यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक महेंद्र मुंजाळ यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले आहे. मराठीसह हिंदूी, तेलगू, कन्नड, तमिळ, उर्दू, मल्याळम्, उडिया, गुजराती, पंजाबी, बंगाली, आसामी या भारतीय भाषांसह इंग्रजीतील स्त्रीवादी साहित्याचा मागोवा या ग्रंथामध्ये घेण्यात आला आहे. त्या-त्या भाषेतील जाणकार संशोधक-अभ्यासकांनी त्यासाठी लेखन केले आहे. डॉ. सुनंदा पाल, डॉ. मीनाक्षी शिवरामन, डॉ. अनामिका, सुप्रिया सहस्रबुद्धे, डॉ. शोभा शिंदे, डॉ. मंगला आठलेकर, प्रा. रुपाली शिंदे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ.अल्लादी उमा, एम. श्रीधर, डॉ. ए. संकरी, ममता सागर, शरश्चंद्र नायर, बसंतकुमार पांडा, सोमा बंदोपाध्याय, शशी पंजाबी, डॉ. दर्शना ओझा या अभ्यासकांचे विस्तृत लेख या ग्रंथामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
गेल्या साडेचार दशकांपासून भारतीय भाषांतील स्त्रीवादी साहित्याने आपला एक स्वतंत्र जोरकस प्रवाह निर्माण केला आहे. या आधुनिक स्त्रीवादी साहित्याची ओळख मराठीतील वाचकांना व्हावी आणि या विषयाच्या अभ्यासकांना एक चांगला संदर्भग्रंथ मराठीमध्ये उपलब्ध व्हावा, हा हेतू समोर ठेवून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. अशा प्रकारचा भारतीय भाषांतील हा पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.
डॉ. अश्विनी धोंगडे म्हणाल्या, ‘स्त्रियांवर केलेले लेखन म्हणजे स्त्रीवादी साहित्य असा गैरसमज आपल्या समाजामध्ये आहे. एवढेच नाही तर, स्त्रीवाद या संकल्पनेबाबत स्त्री-पुरुष लेखकांमध्येही मतभिन्नता आहे. हे ध्यानात घेऊन स्त्रीवाद म्हणजे काय हे अधिक खोलात जाऊन स्पष्ट करणारी दीर्घ प्रस्तावना मी या ग्रंथासाठी लिहिली आहे. त्यामध्ये स्त्रीवादाची संपूर्ण भारतीय मांडणी केली आहे. भारतीय भाषांमधील स्त्रीवादाचा विशाल साहित्यपट वाचकांना पाहण्यास मिळेल आणि या स्वतंत्र प्रवाहाचे सामथ्र्यही जाणवेल.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा