पुणे: भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नांनी शुक्रवारी (ता.3) प्रथमच भारतीय आंबे समुद्रमार्गे अमेरिकेला पाठवले आहेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनिल पवार यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाभा ॲटोमिक रीसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स प्रा. लि. यांच्या वतीने कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र येथून अमेरिकेला देशातून प्रथमच आंब्याची समुद्रमार्गे निर्यात करण्यात आली. यावेळी भाभा ॲटोमिक रेसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंब्याच्या समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंब्याचा वाहतूक खर्च दहा टक्क्यांवर येणार असून त्यामुळे अमेरीकेतील बाजारपेठेत भारतीय आंबा स्पर्धात्मकरित्या उतरुन इतर देशांतील आंब्याशी स्पर्धा करु शकेल, तसेच समुद्रमार्गे निर्यातीमुळे आंबा सुमारे दीड महिन्याच्या जादा कालावधीसाठी तेथील बाजारपेठेत राहील. भारतीय आंब्याच्या इतिहासातील ही अत्यंत महत्त्वाची घटना असून त्यामुळे आंब्याच्या निर्यातीमधे क्रांतिकारक बदल होईल, असंही सुनील पवार यावेळी म्हणाले.

डॉ. टी. के. घंटी यांनी कृषिमालाची निर्यात आणि कृषिमालाची साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कृषी पणन मंडळास सर्वतोपरी मदत करेल. संशोधनात आम्ही मोठे काम करत आहोत तथापि आमचे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी पणन मंडळाने काम करावे, असे आवाहन डॉ. घंटी यांनी यावेळी केले. यावेळी कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील यांनी आंबा निर्यातीसाठी केलेल्या प्रक्रिया तसेच कामकाजाबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

भारतातून सन २०१२ मध्ये अमेरीकेस सुमारे बाराशे टन आंबा निर्यात केला होता. सन २०२१ आणि २०२२ मध्ये कोरोनामुळे अमेरिकेत आंबा निर्यात होऊ शकला नाही. सध्या अमेरिकेला होणारी आंबा निर्यात पूर्णत: हवाईमार्गे होत आहे. यामुळे निर्यातदारांना प्रतिकिलो सुमारे ५५० रुपये विमानभाडे अदा करावे लागत असून, यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय आंब्याच्या किंमतीतुलनेनं महाग ठरत आहेत. त्यामुळे निर्यातीवर मर्यादा येत आहेत.

सन २०१९मध्ये भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, कृषि पणन मंडळ यांनी संयुक्तरीत्या आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. या प्रयोगामध्ये आंब्यावर गरम पाण्याची प्रक्रिया, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरने विकसित केलेल्या आंब्याच्या शेल्फ-लाईफ साठीची थंड पाण्यातील रासायनिक प्रक्रिया, विकिरण प्रक्रिया, प्रशीतकरण आणि शीतगृहात साठवणूक करुन आंब्याचा कंटेनर भरुन कंटेनर कृषि पणन मंडळाच्या विकिरण सुविधेच्या आवारात विद्युत पुरवठा देऊन ठेवण्यात आला होता. सदर कंटेनर 38 दिवसांनी उघडण्यात आला. या कंटेनरमधील आंबा सुस्थितीत होता. तथापि, यामध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करुन पुन्हा चाचणी घेणे आवश्यक होते. मात्र करोना काळात ते घडू शकले नाही.

यंदा ३० मे पासून आंब्यावर सर्व प्रकारच्या प्रक्रिया करुन टप्प्याटप्याने आंबा शीतगृहात साठविण्यात आला होता. एकूण १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे पाठविण्यात आला असून तो अमेरीकेत नेवार्क या न्यूजर्सी शहराजवळील बंदरात पोहोचेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian mangoes shipped to us for first time by sea exporting 16 tonnes of mangoes pune print news rmm
Show comments