पुणे : पद कितीही मोठे असले, तरी उत्साहाला परिसीमा नसते याचा प्रत्यय नुकताच पुण्यात आला. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ही देशातील प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेने नुकतीच 75 वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने विशेष सोहळाही झाला. देशाच्या नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार या सोहळ्याला उपस्थित होते. हरिकुमार यांच्या या एनडीए भेटीमध्ये एक अनोखी गोष्ट घडली.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील छात्रांसह चक्क नौदल प्रमुखांनी पुशअप्स मारल्या. नौदलाच्या पांढऱ्या गणवेशात असलेल्या ६१ वर्षीय नौदलप्रमुखांनी जमिनीवर हात टेकवून तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने पुशअप्स मारले. त्यांच्याबरोबर एनडीएतील युवा छात्रांनीही पुशअप्स मारले. नौदलाच्या प्रमुखांनी छात्रांबरोबर पुशअप्स मारण्याच्या या उत्साहवर्धक क्षणाची चित्रफीत नौदलाने एक्स समाजमाध्यमावर प्रसिद्ध केली आहे.
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : VIDEO : नौदलाला मोठं यश, सोमालियाजवळ अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील १५ भारतीयांसह २१ जणांची सुटका
नौदलप्रमुख आर. हरिकुमार एनडीएचेच माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे नौदलाच्या प्रमुख पदावर असूनही त्यांनी छात्रांच्या उत्साहाला तोडीस तोड अशा पद्धतीने पुशअप्स मारल्या.